छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक वसाहतीसोबत खासगी कार्यालयातील बोनस वाटप सुरू झाला आहे. बोनस व त्यासोबत पुढील महिन्याचा पगारही आगाऊ दिला जात आहे. ही सर्व रक्कम बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. व्यापारीही आपल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी सरसावले आहेत. दीड लाख कर्मचाऱ्यांना १५० कोटींपेक्षा अधिक बोनस दिला जाणार आहे. येत्या १३ दिवसांत बाजारात १८०० कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे व्यापारी संघटनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारचा दिवस शहरवासीयांनी ‘खरेदी के नाम’ केला. ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्याची प्रचिती यंदा ‘दसरा’च्या उलाढालीत दिसून आली. याची पुनर्रावृत्ती दिवाळीतही दिसून येत आहे.
शहरात ४५ हजार व्यापारीआजघडीला महानगरपालिका हद्दीत लहान-मोठे ४५ हजार व्यापारी आहेत. त्यांच्याकडे सुमारे दीड लाख कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. तसेच २५ ते ३० हजार हंगामी कर्मचारी आहेत. यातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येत आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत या कर्मचाऱ्यांना बोनस व्यापारी देतील. सुमारे १५० कोटीचा बोनस वाटप केला जाईल. बोनसची ही सर्व रक्कम बाजारात येईल.- लक्ष्मीनारायण राठी, वरिष्ठ उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
पाडव्यापर्यंत कोट्यवधींची उलाढालआता बाजारात मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. रेडिमेड कपडा, इलेक्ट्रॉनिक्स बाजार, इलेक्ट्रिकल्स बाजार, टू व्हिलर, फोर व्हिलर बाजार, जाधववाडी, मोंढा, मॉल याकडे ग्राहकांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. सर्व क्षेत्रात मिळून भाऊबीजपर्यंत म्हणजे ३ नोव्हेंबरपर्यंत बाजारात १८०० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. यंदा सर्वाधिक उलाढाल या दिवाळीत होईल.- अजय शहा, ‘कॅट’ राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष