छत्रपती संभाजीनगर : मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध खात्यांचे मंत्री शहरात दाखल होत असल्याचे औचित्य साधून विविध पक्ष-संघटनांनी शनिवारी काढलेल्या मोर्चे, धरणे आंदोलनांनी शहर दणाणून गेले.
गेल्या सात वर्षांपूर्वी शहरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी शिक्षकांच्या मोर्चावर लाठीहल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यावेळी पोलिसांनी विशेष खबरदारी घेत मोर्चा अडविण्याचे ठिकाण तर बदललेच; शिवाय निवेदन देण्यासाठी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला पोलिसांच्याच वाहनातून नेण्याची व्यवस्था केली होती.
मोर्चाची सुरुवात क्रांती चौकातून, तर शेवट भडकल गेटजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर. विशेष म्हणजे, यावेळी मोर्चाच्या मार्गातही बदल करण्यात आला होता. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीतील बाजारपेठेवर फारसा परिणाम झाला नाही. क्रांती चौकापासून निघालेले मोर्चे नूतन कॉलनी, समतानगर, क्रांती चौक पोलिस ठाणे, निराला बाजार, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, खडकेश्वर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळमार्गे डॉ. आंबेडकर पुतळा येथे अडविण्यात आले. दरम्यान, आंदोलनामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गालबोट लागू नये म्हणून संपूर्ण शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहून चाकरमान्यांशिवाय बहुतांश स्थानिक नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.
वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चात ‘डीजे’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या घोषणा, पांढरे वादळ महिला मोर्चातील महिलांच्या गगनभेदी घोषणा; याशिवाय ऑल इंडिया पँथर सेना, बहुजन कामगार शक्ती महासंघ, मराठा आरक्षण मोर्चा, धनगर आरक्षण मोर्चा, नायकडा आदिवासी लमाण विकास फाउंडेशन, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार संघर्ष समिती, रिपाइं (डेमोक्रॅटिक) यासह लहान-मोठ्या मोर्चातील पारंपरिक वाद्य, गाणी तसेच सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. आजचा दिवस म्हणजे जणू आंदोलनाचा दिवस, असेच दिवसभर वातावरण होते.