फुलंब्री : तालुक्यात नुकतेच दोन ते तीन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडविली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून सडला आहे, तर बाजारात भाव नसल्याने काहींचा कांदा चाळीत सडत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
फुलंब्री तालुक्यात मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे जमिनीत पाणीपातळी चांगली असल्याने यंदा रबी, तसेच उन्हाळी पिकांमध्ये वाढ झाली. यंदा चांगला भाव मिळेल या आशेने तालुक्यातील बाराशे शेतकऱ्यांनी ८०० एकर क्षेत्रात कांदा लागवड केल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर लागवड केली, त्यांचे पीक शेतातून घरात आले. मात्र, ज्यांनी उशिरा लागवड केली, त्यांचे पीक नैसर्गिक संकटात सापडले आहे. सध्या काही दिवसांपासून वादळी, वारे, गारपिटीसह अवकाळी पाऊस होत असून, यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जमिनीच्या बाहेर काढून ठेवलेला कांदा ओला होऊन सडला आहे, तर दुसरीकडे भाव मिळेल या आशेने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
एकरी ५० हजार रुपये खर्चकांदा लागवड करण्यापासून काढणीपर्यंत प्रतिएकर ५० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना आलेला आहे. यात शेती तयार करणे, लागवड करणे, बियाणे, खते, औषधी फवारणी, खुरपणी काढणी आदींचा समावेश आहे. असा खर्च झालेला असताना शेतकऱ्यांना मात्र लावलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.
बाजारातील भावही गडगडलेमागील वर्षी कांदा पिकाला प्रतिक्विंटल दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, सध्या कांदा दरात मोठी घसरण झाली असून, ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.
कांदा साठवणीची अडचणतालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यातील मोजक्या शेतकऱ्यांकडेच कांदा साठवणीकरिता चाळ उपलब्ध आहेत. इतर शेतकऱ्यांना कांदा काढणीनंतर साठवणीसाठी व्यवस्था नसल्याने तो तत्काळ बाजारात विक्रीसाठी न्यावा लागतो. यामुळे दर कमी असले तर याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
२२५ एकर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसानफुलंब्री तालुक्यात यंदा ४११ हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड झालेली होती. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने प्राथमिक माहितीनुसार ९० हेक्टर म्हणजे २२५ एकर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात पंचनामे केले जात आहेत.- भारत कासार, तालुका कृषी अधिकारी, फुलंब्री