छत्रपती संभाजीनगर : शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी शहरातुन हजारो महिला जाधववाडी परिसरात येत आहेत. महिलांची होणाऱ्या गर्दीमुळे चाेरट्यांनीही कथेकडे मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. कथेच्या पहिल्याच दिवशी परिसरातुन तीन महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर समर्थनगर परिसरात मॉर्निक वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. या प्रकरणी क्रांतीचौक, एमआयडीसी सिडको आणि सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून मंगळसूत्र चोरांनी धुमाकूळ घातला आहे. एकदिवसाआड मंगळसूत्र हिसकावल्याची घटना उघडकीस येत आहे. समर्थनगर भागात मॉर्निंक वॉकला घराबाहेर पडलेल्या जयश्री बाळासाहेब तोडकरी (रा. नागरेश्वरवाडी) यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र १ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. त्यानंतर चोरटे पसार झाले. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. जाधववाडीतील शिव महापुराण कथा ऐकल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील सहा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. ही घटना एन १ परिसरातील काळा गणपती मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदवली. तिसऱ्या घटनेत रोहिणी शशिकांत ठोंबरे (रा. पिसादेवी) यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोराने गर्दीतून लंपास केले. ही घटना जाधववाडीतील मैदानावर घडली. चौथी घटनाही याच मैदानावर घडली. मंगल कल्याणसिंग ताजी (रा. टीव्ही सेंटर) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे डोरले चोराने लंपास केले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत.
शहर पोलिसांपुढे तपासाचे आव्हानशहरात मंगळसूत्र चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे शहर पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. तसेच जिवघेणा हल्ला, लुटमारीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यासही अटकाव घालण्याचे आव्हान असणार आहे.