छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २०१९ सालच्या निवडणुकीत ट्रॅक्टर फॅक्टरमुळे चर्चेत राहिलेले माजी आ. हर्षवर्धन जाधव यांनी यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कुठलाही गाजावाजा, शक्तिप्रदर्शन न करता पहिल्याच दिवशी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरूवार, १८ एप्रिलपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी ६० जणांनी ११८ उमेदवारी अर्ज घेतले. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांच्यासाठी चार अर्ज नेण्यात आले आहेत. मात्र पहिल्या दिवशी हर्षवर्धन जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. जाधव यांनी अपक्ष म्हणून २०१९ ची निवडणूक लढवली होती. त्यांनी घेतलेल्या २ लाख ८३ हजार ७९८ मतांमुळे एमआयएमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. यावेळीही त्यांनी निवडणूक रणसंग्रामात उडी घेतली आहे.
२८ हजार मतदार वाढलेजिल्ह्यात ३० लाख ६० हजार ६३९ मतदार झाले आहेत. २८ हजार मतदार वाढले असून, २५ एप्रिलपर्यंत मतदारांची यादी अंतिम होईल. त्यानंतर पुन्हा मतदारांचा आकडा वाढेल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची उपस्थिती होती.
महायुती वगळता सर्वांनी घेतले अर्जमहायुती वगळता सर्व प्रमुख उमेदवारांच्या सूचकांनी आज उमेदवारी अर्ज खरेदी केले. यात ठाकरे सेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी उमेदवारांचा समावेश आहे.