शहरातील डाॅक्टर दाम्पत्य, निवृत्त शिक्षकांचा आदर्श उपक्रम
योगेश पायघन
औरंगाबाद : विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत असलेल्या शहरापासून जेमतेम वीस किलोमीटर अंतरावर आदिवासी गोंड समाजाची वस्ती आहे. येथील मुलांना ना शाळा माहिती होती, ना शिक्षण; पण एका डॉक्टर दाम्पत्याच्या आणि निवृत्त शिक्षकांच्या अथक प्रयत्नांतून आता या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पसरू लागला आहे.
सुमारे तीस वर्षांपासून मिळेल त्या जागेवर पाल टाकून राहणाऱ्या भटक्या आदिवासी गोंड समाजाच्या ७० कुटुंबांची वस्ती आहे. या वस्तीवरील ४० मुले सध्या शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवत आहेत. शहरातील डॉ. श्रीरंग आणि डॉ. अनिता देशपांडे, निवृत्त शिक्षक उज्ज्वला निकाळजे यांच्या चमूने या कामासाठी पुढाकार घेतला आहे. दर रविवारी सकाळी या तांड्यावरील मुले शहराच्या वाटेवर डोळे लावून बसतात. वस्तीचे प्रमुख गोपीचंद कुमरे सगळ्या मुलांना गोळा करतात आणि मग हाती पाटी पेन्सिल घेतलेल्या या मुलांचा कोवळ्या उन्हात किंवा तिथे घातलेल्या एका ताडपत्रीच्या सावलीत वर्ग भरतो.
उज्ज्वला निकाळजे विद्यार्थ्यांना अंक व अक्षर ओळख करून देतात. ॲड. चिन्मयी, डॉ. अनिता, मोहिनी, वैशाली या मुलांकडून उजळणी करून घेतात. त्यानंतर बडबडगीते, व्यावहारिक ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या जातात. चित्रे काढणे, रंगवणे, खेळ यातही मुले दंग होतात. काही जण जादूचे प्रयोग करून दाखवतात. या मुलांचे आई, वडील, वस्तीचे इतरही लोक भोवताली उभे राहून आणि आपापली कामे करत हे सगळे कौतुकाने पाहत असतात. शेवटी खाऊचे वाटप केले जाते. पुन्हा पुढच्या गुरुवारी येण्याबद्दल ही मुले शिकवणाऱ्यांना विचारतात. सुरुवातीला काही आठवडे वर्ग उघड्यावर भरले. आता येथे एक ताडपत्री लावण्यात आली आहे. माईक, फळा, मुलांना पाट्या, अशी व्यवस्थाही हळूहळू केली जात आहे.
चौकट
दिवाळी पाडव्याला केला संकल्प
या वस्तीवरील मुलांच्या आरोग्य व शिक्षणाची काळजी घेण्याचा संकल्प नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ. श्रीरंग देशपांडे यांनी दिवाळी पाडव्याला केला. या उपक्रमात ॲड. चिन्मयी व डाॅ. अनिता देशपांडे, उज्ज्वला जाधव-निकाळजे, मोहिनी रसाळ, वैशाली आठवले, अतुल व सुलोचना वाघवसे आदी उत्साहाने सहभागी होतात.
कोट
मुलांचे वर्ग बदलताहेत शिक्षण नाहीच
ही गोंड आदिवासी कुटुंबे आयुर्वेदिक जडीबुटी विकणे, कानातील मळ काढून देणे, अशी काहीबाही कामे करून उदरनिर्वाह करतात. वर्षभर फिरता व्यवसाय करून पावसाळ्यात या मोकळ्या गायरानात जमतात. ताडपत्री, साड्या लावून केलेल्या झोपड्यांत राहतात. इथली मुले नावापुरती शाळेत आहेत. मात्र, वाहता रस्ता ओलांडून त्यांना शाळेत पाठवण्यास पालक धजावत नाहीत.
-गोपीचंद कुमरे, वस्तीचे प्रमुख
कोट
पायावर उभे करण्यासाठीचा प्रयत्न
डाॅ. श्रीरंग देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आम्ही सुरू केला. आठवड्यातून दोन दिवस वस्तीवर येऊन मुलांना स्वच्छता, अक्षरओळख, गाणी, गणित, भाषा शिकवतो. मुलेही आता आम्हाला ओळखायला लागली आहेत. शिकायची गोडीही त्यांच्यात निर्माण होत आहे. उशीर झाल्यास वाट पाहतात. त्यांना आवश्यक व्यावहारिक ज्ञान देत त्यांच्या पायावर उभे करण्यासाठीचा प्रयत्न आहे.
-उज्ज्वला निकाळजे-जाधव, माजी मुख्याध्यापक, शारदा मंदिर प्रशाला
-------