प्रवासी संख्येवर ठरते : होल्ड ठेवून चालक व वाहकांची गैरसोय टळते
- साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बससेवा सुरू झाली असून, त्यांना अपेक्षित प्रवासी संख्या मिळाली तरच बसच्या फेऱ्या अधिक वाढविल्या जातात. अन्यथा बसेस आगारात थांबत आहेत.
कोरोनामुळे प्रवाशांनी महत्त्वाच्या ठिकाणी जाण्याचे टाळले असून, नोकरी करण्यासाठी जाणारेच बसद्वारे प्रवासासाठी पसंती देत आहेत. आता अनेक नागरिक बाहेर जाण्याचे टाळत आहेत. प्रवाशांची संख्या पाहूनच गाड्या सोडल्या जात आहेत. मुक्कामी जाणाऱ्या जवळच्या गावातील गाड्या गावात नव्हे, तर त्या आगारातच मुक्कामी थांबविल्या जात आहेत. शक्यतो, बीड, गेवराई, नांदेड, उस्मानाबादसाठी गाड्या सोडल्या जात असून, त्याही प्रवासीसंख्येनुसारच चालविल्या जातात. जिल्ह्यात ५५० बसेस असून, आगारातून ४५० बसेस चालविल्या जातात. त्यात लांब पल्ल्यासाठी जाणाऱ्या १०० बसेस आहेत. उशिरा स्थानकातून प्रवासी नसतील, तर गाडी आगारातच थांबवून ठेवली जाते. कर्मचाऱ्यांचा टी. ए., डी. ए. आदी खर्च वाढत असल्याने सहसा मुक्कामी बस सोडल्या जात नाहीत.
५० टक्के बसेस आगारातच...
१) प्रवाशांची म्हणावी तसी गर्दी स्थानकात दिसत नाही.
त्यामुळे प्रवाशांच्या संख्येनुसारच बसेस चालविण्याचा निर्णय घेतला जातो.
२) जवळच्या तालुक्यात मुक्कामी जाणारी व मुक्कामी राहणारी बसदेखील आगारातच मुक्कामी थांबविली जाते. कारण गावातून तेवढे प्रवासी सध्या मिळत नाहीत.
३) अजून शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नसल्याने सकाळी विद्यार्थ्यांची गर्दीच नसते. त्यामुळे मुक्कामी बस थांबविणे शक्य नाही.
- दुसऱ्या डेपोत बसेस मुक्कामी थांबविल्या जातात. परंतु परतीच्या प्रवाशांची संख्या नसेल तर मुक्कामी बस थांबविण्यात काहीही अर्थ नसतो. सध्याच्या परिस्थितीवरून वाहकांना विनाकारण मुक्कामी ठेवणे अधिक कठीण होत आहे. प्रवासी संख्या पाहून निर्णय घेतला जातो.
- अमोल अहिरे, एस. टी .महामंडळाचे अधिकारी
रुग्ण घटले; एसटी कधी धावणार?
- तिसऱ्या लाटेच्या धाकाने प्रवासी बाहेर निघत नाहीत. परंतु मास्क, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित अंतर ठेवून प्रवास केल्यास काही परिणाम होत नाही. रुग्ण संख्या घटली असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करणे गरजेचे आहे.
- स्वरूपचंद दाभाडे (प्रवासी)
- रुग्ण घटले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. परंतु येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी रातराणी, लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करून गैरसोय टाळण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांना बसचा प्रवास सोयीच ठरू शकतो.
- शेख मतीन (प्रवासी)