औरंगाबाद : एका मोबाइलवर क्रमांकावरून कोणतेही ऑनलाइन व्यवहार होत नव्हते. तुमचे एसबीआय बँकेचे योनो ॲप ब्लॉक झाले आहे. ते सुरू करण्यासाठी पॅन नंबर अपडेट करावा लागेल. त्यासाठी एका लिंकवर जा. त्या लिंकवर गेल्यानंतर योनो ॲपचा यूझर आयडी आणि पासवर्ड टाका, असे मेसेज आले. पण संबंधिताने ते करताच दोन वेळा अकाउंटमधून एक लाख ५७ हजार ३०१ रुपये गेल्याचे मेसेज आले. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात १६ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
सिटी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यभान मुरकुटे (रा. हडको) हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. ते २१ जानेवारी रोजी रात्री एन १२ येथील स्टुडिओत काम करीत होते. त्यांचा एक मोबाइल क्रमांक लॉक झाला होता. त्यावरून कोणतेही ऑनलाइन व्यवहार होत नव्हते. तेव्हा त्यांच्या एसबीआय बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर मेसेज आला. त्या मेसेजमध्ये तुमचे योनो अकाउंट ब्लॉक झाले आहे. त्यासाठी तुम्हाला पॅन अपडेट करावे लागेल. अपडेट करण्यासाठी https;//cutt.ly/gifgasn ही लिंक देण्यात आली. या लिंकवर मुरकुटे यांनी क्लिक करून पॅन अपडेट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना एसबीआय याेनो ॲपचा यूझर आयडी व पासवर्ड मागण्यात आला. त्यांनी तो टाकल्यानंतर पहिल्यांदा २५ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यातून वजा झाले. यानंतरही त्यांनी दुसऱ्यांदा यूझर आयडी व पासवर्ड टाकला. तेव्हा एक लाख ३२ हजार ३०१ रुपये गेले.
फसवणूक होताच पोलिसांत धाव
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुरकुटेंनी बँकेला मेल करून योनो, योनो लाइट हे दोन्ही अकाउंट व डेबिट कार्ड बंद केले. यानंतर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर १६ एप्रिल रोजी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक अशोक भंडारे करीत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंक ओपन करू नयेत, बँकेचे पासवर्ड, आयडी देऊ नयेत, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी केले आहे.