औरंगाबाद : शहरात सोमवारी कोरोनाबाधित एक रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. महापालिकेने विमानतळावर कोरोना चाचण्या सुरू केल्या असून, मेल्ट्रॉन हॉस्पिटलसह पाच आरोग्य रुग्णालयेही सज्ज ठेवली आहेत. रुग्णवाढीचा अंदाज घेऊन आरोग्य केंद्रांसाठी कंत्राटी स्वरूपात नोकरभरतीदेखील केली जाणार आहे.
केंद्र व राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाला कोरोनासंदर्भात आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तपासण्या वाढवण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी औरंगाबाद शहरात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.
पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, हा २७ वर्षीय व्यक्ती शहरातील एका खासगी रुग्णालयात ब्रदर म्हणून काम करतो. संजयनगर-मुकुंदवाडी भागात एका खोलीत तो एकटाच राहतो. खासगी रुग्णालयात काम करताना त्याला खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने एमजीएम येथील केंद्रात कोरोना तपासणी केली, त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात अन्य कुणीही आलेले नाही.
विमानतळावर चाचणीची व्यवस्थादरम्यान, महापालिकेने विमानतळावर कोरोना चाचणी सुरू केल्याची माहिती डॉ. मंडलेचा यांनी दिली. ४१ ठिकाणी पालिकेने कोरोना चाचणीची व्यवस्था केली आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटलसह सिडको एन ८, एन ११, नेहरूनगर, पदमपुरा येथील केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहेत. या पाच ठिकाणी मिळून सुमारे ६५५ खाटांची व्यवस्था आहे. सर्व खाटांना ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. रुग्णवाढीचा अंदाज घेऊन या पाच रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.