नांदेड : विष्णूपुरी प्र्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे नांदेडकरांना एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आज स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे यांनी सभेत घेतला़ शहराला डिसेंबर २०१४ पर्यंत एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ महापालिका स्थायी समितीची सभा आज सभापती पवळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे शहरात दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्याऐवजी एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी केली़ यासंदर्भात सभापती पवळे यांनी शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेवून प्रशासनाला सूचित केले़ सणासुदीच्या काळात नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी डिसेंबर २०१४ पर्यंत एक दिवसआड पाणी सोडण्याच्या ठरावाला मंजुरी मिळाली़ विशेष म्हणजे मागील स्थायी समितीच्या बैठकीत पाणी सोडण्याच्या मुद्यावरून राजकारण करणाऱ्या सदस्यांनी आज स्थायी समितीच्या सभेत या निर्णयाला मान्यता दिली़मागील महिन्यात विष्णूपुरी प्रकल्पात अवघे ८ दलघमी पाणी शिल्लक राहिल्यामुळे शहराला आठवड्यातून एक वेळेस पाणी सोडण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला होता़ या प्रस्तावावर सभापती पवळे यांनी आठ दिवसाऐवजी पाणी सोडण्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र या निर्णयाला स्थायी सदस्यांनी विरोध करून हा विषय सर्वसाधारण सभेत मांडण्याचा निर्णय घेतला़ यावेळी सभापतींनी हा विषय स्थायीचा असल्याचे सांगितले़ परंतु त्याकडे दुर्लक्ष करून सदस्यांनी सर्वसाधारण सभेकडे बोट दाखविले़ आज मात्र सदस्यांनी आजच्या सभेतच पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला़ सभेत ९ विषय मंजूर करण्यात आले़ यामध्ये सार्र्वजनिक दवाखान्यासाठी लागणारी औषधी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी २३ लाख ४९ हजार ४४४ निधी मंजूर करण्यात आला़ जेएनएनयुआरएम अंतर्गत रेल्वेस्टेशन ते बाफना टी पॉर्इंट व बाफना आरओबी ते महाराणा प्रताप चौक ते नमस्कार चौक, बाफना टी पॉर्इंट ते ईदगाह कमान या रस्त्यावर ड्रेनेजलाईन टाकल्यामुळे हे रस्ते नादुरूस्त झाले आहेत़ या रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे कंत्राटदाराकडून हाती घेण्यात आले आहेत़ या खर्चास मान्यता देण्यात आली़ यावेळी आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे, सरजितसिंघ गिल, उपायुक्त राजेंद्र खंदारे, नगरसचिव बंकलवाड, सदस्य विनय गिरडे, सुशीला चव्हाण, गुरमितसिंघ नवाब, प्रभावती चव्हाण, शांताताई मुंडे, किशोर यादव, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
एक दिवसआड पाणीपुरवठा
By admin | Published: September 07, 2014 12:20 AM