औरंगाबाद: सुलभ आणि प्रभावी कृषि विषयक धोरण तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून शेतकरी समस्यांचे मुळापर्यंत जाणेसाठी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी “ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे.
या उपक्रमाचा कालावधी १ सप्टेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत राहणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतावर व ग्रामीण भागात राहून त्यांचे दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणीवार त्यांचे सोबत त्यांच्या विविध कामांत सहभागी होऊन चर्चा करणार आहेत.
या उपक्रमाची राज्यस्तरीय सुरुवात १ सप्टेंबर, २०२२ रोजी स्वत: कृषि मंत्री महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम अशा मेळघाटातून करणार आहेत. धारणी चिखलदरा या अत्यंत दुर्गम ,डोंगराळ, कोरडवाहू व आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत ते संपूर्ण दिवसभर असणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी,समस्या, त्यातून निर्माण होणारे नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या शेतकरी आत्महत्या यासंदर्भात योजना तयार करणारे व ती राबविणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणमीमांसा करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे या अनुषगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे.
कृषि व संलग्न विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोचतात का याची समीक्षा कृषि मंत्री करणार आहेत. शेतकऱ्यांना होणारा पतपुरवठा , त्यांची सामाजिक सुरक्षा , आरोग्य , शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार , पिकांमधील वैविधीकरण व शेतकऱ्यांची मार्केटला जोडणी याबाबत अतिशय सुक्ष्म पद्धतीने अभ्यास ते करणार आहेत. या अनुषंगाने उद्या दि. १ सप्टेंबर, २०२२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कृषि विभागातील जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांचेपासून थेट क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या कृषि सहायकापर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देणार आहेत.
उद्याच्या एका दिवसात जिल्ह्यातील किमान ३०० कोरडवाहू गावांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठीचे आवश्यक नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न व समस्या , त्यांना निदर्शनास आलेल्या त्रुटी व अडचणी याबाबत सविस्तर अहवाल सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना देणे बंधनकारक राहणार असल्याचे श्री देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.