औरंगाबाद : शहरातील जयभवानी नगर भागात काल रात्री १०. १५ वाजेच्या सुमारास एकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित केले.
मंगळवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या दरम्यान जयभवानी नगर येथे राहणारे भगवान निवृत्ती मोरे (५०) हे दुध घेऊन घराकडे जात होते. यावेळी रस्त्यातील नाला पावसाच्या पाण्यामुळे ओव्हर फ्लो होऊन वाहत होता. पावसामुळे मोरे यांना नाला न दिसल्याने ते त्यात पडले. नाल्याच्या पाईपमध्ये अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, या भागात नाल्यावर लोकांनी अतिक्रमण केलंय. ती तोडण्याबाबत महापालिका प्रशासनाने उदासीनता दाखवल्याने निष्पाप नागरिकाचा बळी गेला असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मोरे हे मुळचे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पवनी येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले ,१ मुलगी असा परिवार आहे.
उपायुक्तांना केले निलंबित या भागात काही दिवसांपूर्वी अतिक्रमण तोडण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे हे अतिक्रमण तोडून तसेच अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले. त्याच खड्ड्यात पडून भगवान मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून ही नाल्यावरील अतिक्रमणं हटविण्याची मागणी स्थानिक नगरसेवक आणि नागरिक करत होते. मात्र महापालिका प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. या घटनेनंतर मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित केले.