किशन तनवाणींना सेनेत एकटे पाडण्याची खेळी
गुलमंडीवर पाय ठेवायचा नाही तुम्ही महापालिकेच्या लोकांनी... ही गर्जना परवा सायंकाळी गुलमंडीवर केली आणि त्याचे पडसाद पार शेंद्र्यापासून ते विटखेड्यापर्यंत पोहोचले. जवाहर काॅलनी, उल्कानगरीत तर अक्षरश: ‘इफो इफेक्ट’ होता. आजवरच्या अनुभवावरून आम्हास वाटले की, केवळ या गर्जनेने उभी महानगरपालिका गदागदा हलली असेल. रात्री झोपताना महापालिकेत कशी पळापळ झाली असेल, अशी कल्पना करीत झोपलो.
दुसरा दिवस अघटित घटनांनी उजाडला. गुलमंडीवर बुलडोझर, पोकलेन चालक, ओटे, पत्रे जमीनदोस्त केले आणि नाद नाय करायचा... असे न सांगता बजावत हा ताफा पाडापाड करून परत गेला.
सायंकाळी ५ ते सकाळी १० या १७ तासांत काय घडले? सायंकाळी ५ वाजता मास्क लावण्याच्या मुद्द्यावर महापालिकेचे पथक आणि माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांचा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. सेनेचे किशनचंद तनवाणी त्यांच्यासोबत होते. यातूनच गुलमंडीवर पाय ठेवायचा नाही, अशी तंबी दोघांनी महापालिकेच्या पथकाला दिली आणि येथून वर्षभरापूर्वी भाजपमधून शिवसेनेत आलेले किशनचंद तनवाणी यांचे पाय गाळात रुतायला सुरुवात झाली. रात्रभर मोबाईल खणखणले. मुंबईपासून औरंगाबादपर्यंत काही नंबर कायम बिझी राहिले. गुन्हा नोंदवा... असा हिरवा कंदील मिळाला आणि तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात तनवाणींविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याला राजकीय महत्त्व आहे.
वर्षभरापूर्वी तनवाणींना शिवसेनेत आणले, त्यामागे त्यांना सेनेचे जिल्हाप्रमुख बनवण्याची योजना होती. विधानसभेच्या निवडणुकीत सेनेने जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळविले. विधानपरिषदेवर अंबादास दानवे निवडून गेले. आता जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होण्यात कोणतीही अडचण दिसत नव्हती; पण ‘मातोश्री’वरून इशारा मिळत नव्हता. मध्येच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा घाईघाईत औरंगाबाद दौरा झाला. त्यावेळी तनवाणींनी आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाची तयारी केली; पण ठाकरे तिकडे फिरकलेच नाहीत आणि येथूनच काही तरी बिघडल्याचे लक्षात यायला लागले आणि आता तर शासकीय कामात अडथळा... या कलमाखाली गुन्हा दाखल झाला.
जिल्हाप्रमुख पदापर्यंत त्यांनी पोहोचू नये यासाठी सेनेतच हालचाली झाल्या आणि परवाचे गुलमंडीवरचे प्रकरण वेगळ्याच वळणावर गेले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करायचा की नाही, याचा कायदेशीर खल रात्री उशिरापर्यंत पाडला गेला. शेवटी एका फोनने यावर निर्णय झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हा दाखल झाला आणि पाठोपाठ गुलमंडीवर महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक दाखल झाले. ही कृती प्रशासनाची म्हणावी तर योग्य. कारण प्रशासनाला आव्हान देण्याची हिंमत कोणी करू नये, हा संदेश होता आणि कर्मचाऱ्यांच्या मागे मनपा प्रशासन उभे आहे हे दाखविण्याची वेळ होती. याचा दुसरा संदेश राजकीय आहे, तो हा की, गुलमंडी कोणाची खासगी मालमत्ता नाही. आता हा राजकीय संदेश नेमका कोणी दिला, याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ घेत आहेत. तनवाणीविरोधकांनी या प्रकरणाचा वापर करत अलगदपणे त्यांना एकटे पाडले.
शहरात शिवसेनेचा प्रभाव आहे. सरकारमध्ये प्रमुख भागीदार शिवसेना आहे. तरी सेनेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल होतो आणि सेनेचा शहरातील एकही नेता त्यावर भाष्य करत नाही, ही गोष्ट शिवसेनेच्या संस्कृतीत बसत नाही. पोलीस ठाण्यातही राजेंद्र जंजाळ यांच्याव्यतिरिक्त सोबतीला कोणी नव्हते. म्हणजे तनवाणी यांना सेनेत एकटे पाडले गेले हे स्पष्ट होते.
अच्छा तुम्हारे शहर का दस्तुर हो गया ।
जिसको गले लगाया वो दूर हो गया ।।
हा बशीर बद्रचा शेर तनवाणींना आठवत असेल.
- सुधीर महाजन