औरंगाबाद : आरोग्य विभागाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात पाच वर्षांत दीड लाख रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाल्याने जीवदान मिळाले. विशेष म्हणजे पाच वर्षांत रुग्णवाहिकेच्या लाभार्थ्यांची संख्या ३७ हजारांनी वाढली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी २६ जानेवारी २०१४ रोजी या रुग्णवाहिकेच्या सेवेला सुरुवात झाली. जिल्ह्यात ८ अत्याधुनिक जीवनप्रणाली आणि २३ प्राथमिक जीवनप्रणाली असलेल्या अशा एकूण ३१ रुग्णवाहिका आहेत. अपघातात जखमी, जळीत, विषबाधा झालेले रुग्ण, गरोदर माता यांच्यासह विविध आपत्कालीनप्रसंगी गरजूंना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होते. जिल्ह्यात ३१ रुग्णवाहिकांसाठी ७० आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकारी व ७१ आपत्कालीन सहायक नियुक्त आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा समन्वयक ओमकुमार कोरडे, विभागीय व्यवस्थापक तुषार भोसले, जिल्हा व्यवस्थापक डॉ. अमोल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू आहे. जिल्ह्यात २०१४ मध्ये ९ हजार २२ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला होता. यामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. ही संख्या २०१५ मध्ये १५ हजार ६३७, २०१६ मध्ये २७ हजार २९९, २०१७ मध्ये ३३ हजार ७८५ तर यंदा सप्टेंबरपर्यंत ४६ हजारांवर पोहोचली आहे. पाच वर्षांत १ लाख ३३ हजार ३०० रुग्णांना या सेवेमुळे जीवदान मिळाले.
१२ हजार जखमींना मदतअपघातात जखमी झालेल्या रुग्णांसाठी पहिला एक तास महत्त्वाचा असतो. या तासाभरात आवश्यक उपचार मिळाल्यास धोका टळतो. १०८ रुग्णवाहिकेने गेल्या पाच वर्षांत अपघातात जखमी झालेल्या १२ हजार २५३ रुग्णांना व ३४ हजार ४३५ गर्भवती महिलांना तातडीने मदत पोहोचविली.