औरंगाबाद : उल्कानगरीतील बंद घरफोडून चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाखाचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. शुक्रवारी दुपारी साडेतीन ते रात्री साडेदहादरम्यान झालेल्या या घटनेप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
उल्कानगरीतील कासलीवाल विश्व अपार्टमेंटमधील रहिवासी मनीष मनोहर वाकारकर (वय ३३)हे खाजगी नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. उल्कानगरी येथील त्यांच्या घरी केवळ त्यांची आई राहते. उल्कानगरी परिसरातच त्यांची बहिण आणि भावजी व्यंकटेश पाटील राहतात. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मनीष यांची आई घराला कुलूप लावून बहिणीच्या घरी गेली. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सुमारे सात तोळ्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १लाख ७५ हजाराचा ऐवज चोरून नेला.
रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास मनीष यांची आई घरी जाण्यासाठी निघाली त्यावेळी त्यांचे जावई व्यंकटेश पाटील आणि मुलगी यांनी त्यांना तेथेच मुक्कामी राहण्याचा आग्रह धरला. एवढेच नव्हे तर घर सांभाळण्यासाठी मी फ्लॅटवर झोपण्यासाठी जातो, असे सांगून पाटील हे मनीष यांच्या घरी गेले.त्यावेळी त्यांना फ्लॅटचे दार उघडे दिसले. त्यांनी आत डोकावून पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी घरफोडल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना कळविली.