वाळूज महानगर : खानावळ चालविणा-या महिलेचा विश्वास संपादन करुन तिला एक लाखाचा गंडा घालणा-या तरुणाविरुद्ध गुरुवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शबाना बानो शेख कासिम (२९, रा. सावतानगर, रांजणगाव) या रांजणगाव येथे खानावळ चालवितात. विशाल शिवाजी जयस्वाल याने ६ महिन्यांपूर्वी शबाना बानोकडे खानावळ लावली. यातून विशालचे शबाना बानो यांच्याशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले. विशालने १ जून रोजी मोबाईलद्वारे विविध बिलांचा भरणा करण्याबाबत शबाना यांना प्रात्यक्षिक दाखविले.
यानिमित्ताने त्याने त्यांचे एटीएम कार्ड हाताळले. दरम्यान, आजीचे निधन झाल्याचे सांगून तो बनारस या गावी निघून गेला. दरम्यान, २७ जून रोजी शबाना बानो यांनी बँक खाते तपासले असता खात्यामधील ५५ हजार रुपये कमी दिसून आले. तसेच ११ जून रोजी विशाल घरी परतला तेव्हा त्याच्यासमोरच शबाना बानो यांनी स्वयंपाक घरातील डब्यात ६० हजार रुपये ठेवले होते. तो घरातून बाहेर गेला असता पैसे दिसून आले नाहीत. याविषयी पती व घरातील व्यक्तीकडे विचारपूस केली असता त्यांनी पैसे घेतले नसल्याचे सांगितले.
त्यामुळे विशालनेच डब्यातील ६० हजार रुपये चोरले असल्याचा संशय आल्याने त्यास फोन केला. मात्र त्याचा मोबाईल लागला नाही. या प्रकरणी शबाना बानो यांच्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशाल जयस्वालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.