कन्नड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून वडनेर शाखेसाठी दहा लाख रुपये घेऊन जाणाऱ्या शिपायाला मारहाण करून रोख रकमेची थैली लुटून नेणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.
जामडी-वडनेर रस्त्यावर गुरुवारी (दि.६) दुपारी जि. म. बॅंकेच्या वडनेर शाखेचा शिपाई बाबासाहेब बाविस्कर दहा लाख रुपये घेऊन दुचाकी (क्र. एमएच-२० बीझेड ९५३८) ने जात होते. दरम्यान, पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तीन जणांनी त्यांना मारहाण करून, त्याच्याजवळील १० लाख रुपयांची थैली हिसकावून नेली होती. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.
या घटनेचा समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची तीन पथके तयार करण्यात आली होती. तपासात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धार्थ उर्फ पिंटू मच्छिंद्र सोनवणे (३४, रा.चंद्रलोकनगरी, कन्नड ) यास ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याचा भाऊ विनोद उर्फ विनू मच्छिंद्र सोनवणे, शहारुख शहा व विधीसंघर्ष बालक अशा तिघांना लुटण्यासाठी दुचाकीवर पाठविले, तर प्रवीण उर्फ बाळू विश्वनाथ पंडित (रा.चंद्रलोकनगरी), अमोल ज्ञानेश्वर जाधव (रा.इंदिरानगर कन्नड) हे फिर्यादीच्या लोकेशनवर होते. नियोजन पद्धतीने ही लूट केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी विधीसंघर्ष बालकासह पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख ६ लाख ९१ हजार ५०० रुपये व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, तीन मोबाइल हॅण्डसेट असा एकूण ८ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
यांनी लावला छडा
गुन्हे शाखेचे पोनि भागवत फुंदे, पोउपनि संदीप सोळंके, गणेश राऊत, सफौ.वसंत लटपटे, पोहेकॉ विक्रम देशमुख, संजय काळे, किरण गोरे, नामदेव सिरसाठ, पोना.शेख नदीम, संजय भोसले, उमेश बकले, पोकॉ ज्ञानेश्वर मेटे, बाबासाहेब नवले, रामेश्वर धापसे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संतोष डमाळे यांनी कामगिरी केली.