ऑनलाईन लोकमत
परभणी, दि. ४ : 'एक मराठा लाख मराठा' चा नारा देत सकल मराठा समाजाने सकाळी दुचाकी रॅली काढुन मुंबईत होणा-या मोर्चाची जनजागृती केली. अतिशय शिस्तीत निघालेल्या या रॅलीने एक आदर्श घालवुन देत ९ ऑगस्टच्या मोर्चाला येण्याचे आवाहन केले.
मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी येत्या ९ ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी परभणी जिल्ह्यात मराठा समाज सरसावला आहे. मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून आता गावोगावी बैठकावर जोर दिला जात आहे. मोर्चाला जाण्या-येण्याची सोय, तेथील मार्ग, व्यवस्था, आचारसंहिता आदीची माहीती दिली जात आहे. याच पार्श्वभुमीवर शहरात सकल मराठा समाजाने दुचाकी फेरीचे आयोजन केले होते.
सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दुचाकीस्वार गाड्यांना भगवे झेंडे लावुन हजर झाले होते. शिस्तीत गाड्या एकामागोमाग लावल्यात आल्या होत्या. छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन हि रॅली स्टेशन रोडने निघाली. बसस्थानक, उड्डानपुल, जिल्हा परिषद मार्गे विसावा फाटा येथे गेली. तेथून जिल्हा शासकीय रुग्णालय, शिवाजी चौक, गांधीपार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे परत पुतळा येथून वसमत रोडने जात शिवाजी महाविद्यालय मार्गे संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला. हजारोंच्या संख्येने मराठा युवक, यवती व महिलासह दुचाकीस्वार या रॅलीत सहभागी झाले होते.