कळंब : बनावट नोटा रॅकेटमधील आणखी एकास कळंब पोलिसांनी परंडा तालुक्यातील सिरसाव येथून जेरबंद केले. मागील दोन वर्षांपासून हा आरोपी नाशिक पोलिसांना ‘मोस्ट वाँडेट’ होता.शहरातील आठवडी बाजारात बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेली टोळी ७ मार्च रोजी कळंब पोलिसांनी ताब्यात घेतली. या टोळीमध्ये दोन महिला, एक पुरूष तसेच दोन लहान मुलांचाही समावेश होता. या टोळीकडून तीस हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या टोळीतील आरोपी महिला ताई संजू पवार, लाली दत्ता पवार (दोघीही रा. सिरसाव, ता. परंडा) यांना कळंब न्यायालयाने न्यायालयीन तर दत्ता अशोक पवार यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यातील आणखी एक आरोपी अरूण रामा चव्हाण यास पोलिस उपनिरीक्षक सिध्दीकी, पोहेकॉ नाईकवाडी, गिरी, मोमीन यांच्या पथकाने बुधवारी पहाटे सिरसाव येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या १२० तसेच एक हजार रुपयांची एक बनावट नोट पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९० हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. आरोपी अरुण चव्हाण यास कळंब न्यायालयाने १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.बनावट नोटा प्रकरणी अटक केलेला अरुण चव्हाण, हा बनावट नोटा प्रकरणातच नाशिक पोलिसांचा मोस्ट वाँटेड आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. मागील दोन वर्षांपासून नाशिक पोलिस त्याच्या शोधात होते. याप्रकरणी चव्हाण पोलिसांच्या ताब्यात आल्याने नाशिक पोलिसही दोन वर्षांपूर्वीच्या बनावट नोटांचा तपास करतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बनावट नोटा प्रकरणी आणखी एक गजाआड
By admin | Published: March 10, 2016 12:30 AM