औरंगाबाद : सोशल मीडियावर भोज थाळीची ‘एकावर एक फ्री’ अशी जाहिरात देऊन भामट्याने व्यावसायिकाला तब्बल ९० हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास नारेगाव भागात घडला.
बाबासाहेब पंढरीनाथ ठोंबरे हे २४ सप्टेंबर रोजी रात्री मोबाईलवर फेसबुक पाहत होते. यावेळी त्यांना भोज हॉटेलची ‘एका थाळीवर एक थाळी फ्री’ अशी जाहिरात दिसली. त्यांनी सायंकाळी सातच्या सुमारास त्या जाहिरातीवर असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला.
पाच मिनिटांच्या अंतराने वळविले पैसेसमोरून एका भामट्याने त्यांना क्रेडिट कार्डची माहिती विचारली. त्यानुसार ठोंबरे यांनी त्याला माहिती दिली. त्याचवेळी भामट्याने त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन ८९ हजार ८९० रुपये स्वतःच्या खात्यात वळते केले. विशेष म्हणजे अवघ्या दोन ते पाच मिनिटांच्या अंतराने त्याने ४९ हजार रुपये दोनदा काढून घेतले. ९० हजार रुपयांची खरेदी केल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे ठोंबरे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी प्रथम सायबर शाखेशी संपर्क साधला. परंतु त्यांना सिडको पोलिसांकडे पाठविण्यात आले.
फसवी जाहिरात सुरूच...सिडको भोज थाळीची जाहिरात पाहून यापूर्वी शहरातील अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ओटीपी नंबर किंवा इतर तपशील ऑनलाईन बँक अथवा इतरांना देऊ नका, मोफत जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
एक खाते बंद, दुसरे चालूचभोज हॉटेलकडून अशी कोणतीही जाहिरात केली जात नसल्याचे वारंवार सांगण्यात आले आहे. याबाबत सायबर पोलिसांकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली आहे. मात्र, तरीही भामटे सोशल मीडियावर एक खाते ब्लॉक झाले की दुसरे खाते उघडून लोकांची फसवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे करीत आहेत.