लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बांधकाम भागीदारीत विश्वासघात करून २७ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर. के. कॉन्स्ट्रोचे मालक समीर मेहता यास आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.२९) दुपारी अटक केली.फिर्यादी विजय मदनलाल अग्रवाल यांचे मित्र, कमलकिशोर तायल, गोपाल अग्रवाल (रा. एन-३ सिडको) यांच्या भागीदारीतील सिद्धिविनायक इंटरप्रायजेस फर्मच्या नावे हिरापूर (ता. औरंगाबाद) येथे ५ एकर जमीन आहे. सिद्धिविनायक फर्मने २०११ मध्ये आर. के. कॉन्स्ट्रो प्रा.लि.चे मालक समीर मेहता यास करारनामा करून विकसित करण्यासाठी दिली होती. करारनाम्यानुसार फ्लॅट विक्रीतून जी रक्कम येणार होती, ती सिद्धिविनायक इंटरप्रायजेसला व आर. के. कॉन्स्ट्रो यांनी उघडलेल्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात येणार होती. त्या खात्यातून ४५ टक्के रक्कम फिर्यादी विजय अग्रवाल यांना, तर ५५ टक्के रक्कम समीर मेहता याला मिळेल असे ठरले होते. ग्राहकांकडून मिळालेला पहिला धनादेश मेहता याने संयुक्त खात्यात टाकला. नंतर आरोपी समीर मेहताने ग्राहकांना कर्ज देणाºया बँकांना आपल्या अधिकाराचे बनावट पत्र दिले. उर्वरित ग्राहकांचे धनादेश स्वत:च्या खात्यात जमा करून घेतले आणि ती रक्कम स्वत:साठी वापरली.जीपीए रद्द केला...अग्रवाल यांनी करून दिलेला जीपीए मेहता याने रद्द करून रजिस्ट्री कार्यालयात लीज आॅफ पेन्डसीची नोंद केली. असे असतानाही आरोपीने प्रकल्पातील ४७२ फ्लॅट अंदाजे १० लाख ते १६ लाख प्रति फ्लॅटप्रमाणे विक्री केले. त्यातून २७ कोटी १३ लाख रुपये जमा करून इतरांची फसवणूक केली.आणखी एका बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखलरो-हाऊस बंगलोज बुकिंगसाठी ५ लाख घेऊनही सहा महिन्यांत ताबा न दिल्याने, तसेच घेतलेले पैसेही परत देण्यास टाळाटाळ केल्याने बिल्डर संजय कासलीवाल यांच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासलीवाल निवारा गृहप्रकल्पात ७१ लाख रुपयांत रो-हाऊस बंगलोज घेण्याचे ठरले. फिर्यादी प्रतिभा रत्नदीप भिडे-खोब्रागडे (३२, रा. सोळंके लेआऊट, बुलडाणा) यांनी बुकिंगसाठी ५ लाख रुपये दिले; परंतु कासलीवाल यांनी सहा महिन्यांत त्या बंगलोजचा ताबा दिला नाही. पैसे परत मागितले असता सतत उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदारास कर्ज व इतर पैशांची तयारी करून ठेवा, ताबडतोब रजिस्ट्री करून देतो, असे कासलीवाल यांनी सांगितले होते. त्याबदल्यात ५ लाख घेतले होते.
बांधकाम भागीदारीत २७ कोटींच्या फसवणूकप्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:08 AM