औरंगाबाद : कारांजगाव शिवारात दुर्मिळ जातीच्या कासवाची तस्करी करताना वैजापूर पोलिसांनी बुधवारी रात्री एकास अटक केली. यावेळी एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान राजु गोविंद म्हस्के (४२,कोतवालपुरा,मिल कॉर्नर औरंगााबाद) व रामभाऊ (रा.लक्ष्मी नगर,छावणी ) हे दुर्मिळ जातीच्या कासवाची विक्री करण्यासाठी कारांजगाव शिवारात येणार असल्याची माहिती वैजापूर पोलिसांना मिळाली. यावरून डीबी पथकातील कर्मचारी पोना मोईस बेग, संजय घुगे आणि पोलीस पंकज शिपाई गाभुडे यांच्या पथकाने शिवारातील मुंबई - नागपूर हायवेवरील एका हॉटेलवर छापा मारला. यावेळी रामभाऊ हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला तर राजू पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या जवळील पोत्याची पाहणी केली असता त्यात एक दुर्मिळ ग्रीन बॅक जातीचे कासव आढळून आले. या कासवास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. आम्ले यांच्या ताब्यात कासव देण्यात आले.