औरंगाबाद : एका नातेवाईकाने हातात सलाईनची बाटली धरलेली, दुसरा नातेवाईक समोरून स्ट्रेचर ओढतो, तर तिसरा नातेवाईक पाठीमागून स्ट्रेचर ढकलतो... ही परिस्थिती आहे मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार ठरलेल्या घाटी रुग्णालयातील. रुग्णांना उपचारासाठी अपघात विभागापासून सिटी स्कँनसाठी, संबंधित वॉर्डापर्यंत नातेवाईकांनाच स्ट्रेचरवरून न्यावे लागते.
अपघात विभागात रविवारी दुपारी ४.३० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कक्षातून स्ट्रेचरवरून एका रुग्णाला चार नातेवाईक ढकलत प्रवेशद्वाराकडे नेत होते. या नातेवाईकांनी त्यापूर्वी रुग्णाचे सिटीस्कॅन काढून आणला होता. त्यासाठीही त्यांनी स्वत:च स्ट्रेचर ढकलत नेले होते. सोबत कोणीही कर्मचारी आला नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. ही स्थिती फक्त एका रुग्णापुरती नाही. तर घाटीत येणाऱ्या बहुतांश जणांना रुग्णाला वॉर्डात दाखल करेपर्यंत याच दिव्यातून जावे लागते.
घाटीत मे २०१८ रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे तत्कालीन संचालक आणि सध्याचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी स्ट्रेचर ढकलणे ही कर्मचाऱ्यांचीच जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार पाडली पाहिजे, अशी सूचना केली होती. परंतु, या सूचनेचा घाटी प्रशासनाला विसर पडला आहे. शिवाय रुग्णांच्या तुलनेत स्ट्रेचरची संख्याही अपुरी पडते. रुग्णासाठी स्ट्रेचरची शोधाशोध करण्याची वेळही नातेवाईकांवर ओढवते.
-----
नातेवाईकाला अपघात विभागातून सिटी स्कॅनसाठी आम्हीच स्ट्रेचरवरून नेले. घाटीचा कोणताही कर्मचारी सोबत नव्हता. स्ट्रेचर ढकलताना थोडा त्रास झाला. पण ते गरजेचे होते. त्यानंतर पुन्हा अपघात विभागात आलो. येथून रुग्णाला मेडिसीन विभागात रुग्णाला दाखल करणार आहे.
-सय्यद मुश्ताक, नातेवाईक
-----
स्ट्रेचर ढकलण्यासाठी कर्मचारी असतात, हे माहीत नाही. पण त्यांची वाट पाहण्यापेक्षा आम्ही स्वत: लवकर जाऊ शकतो असे वाटते. रुग्णाला सिटी स्कॅनसाठी स्ट्रेचरवरून आम्हीच आणले. तरीही प्रशासनाविषयी आमची काही तक्रार नाही.
- एक नातेवाईक
-----
घाटीतील अपघात विभागासह प्रत्येक वाॅर्डात, शस्त्रक्रियागारात (ओटी) स्ट्रेचर उपलब्ध आहेत. ओटीतून रुग्णाला स्ट्रेचरवरून वाॅर्डात नेताना कर्मचारी असतो. अपघात विभागात गंभीर रुग्णांसोबतही कर्मचारी असतात. परंतु, प्रत्येक रुग्णासोबत कर्मचारी देता येत नाही. प्रामुख्याने ज्यांची प्रकृती गंभीर नसते, अशांसोबत कर्मचारी नसतात.
- डॉ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी
-----
१२००- रुग्णालयात राेजची ओपीडी
९२- रुग्णालयात उपलब्ध स्ट्रेचर
---
फोटो- घाटीत अशाप्रकारे नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागतात.