दूध भुकटी प्रकल्प उभारणीचा ठराव संमत
दूध संघाच्या सभेत निर्णय : २७ ऐवजी खरेदी होणार २८ रुपयांनी
औरंगाबाद : येत्या एक मार्चपासून जिल्हा दूध उत्पादक संघाने दूधखरेदीच्या भावात एक रुपयाने वाढ केली आहे. २७ ऐवजी २८ रुपये प्रतिलिटर या भावाने दुधाची खरेदी होईल.
जिल्हा दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे होते. व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले; तर संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी प्रास्ताविक केले.
सभेत एक ते नऊ विषय एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच जादा दुधाची भुकटी करण्यासाठी दूध भुकटी प्रकल्प उभारणीचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.
सर्वसाधारण सभा प्रश्नांना उत्तरे न देता आल्यामुळे गुंडाळण्यात आल्याचा आरोप करीत डॉ. कल्याण काळे यांनी जिल्हा दूध संघाचा नफा कमी होत असून संचालक मंडळाने दूध संघ डबघाईस आणून सोडला आहे, असा आरोप केला. दूध संघाची तीन कोटी २६ लाख रुपये थकबाकी कशामुळे वाढली, त्याला जबाबदार कोण, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. एकीकडे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत असताना दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाने भागीदार दूध उत्पादकांना नोटिसा बजावून थकबाकी वसूल करण्याचे ठरविले. यामागे त्यांचे दूध उत्पादकांना दिलासा देण्याचे धोरण होते, असे स्पष्टीकरण अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले.