औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागामध्ये शनिवारी सकाळी एका माजी विद्यार्थ्याने नैराश्यामध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नाट्यशास्त्र विभागात कार्यरत एका सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे सदरील विद्यार्थ्याचे प्राण वाचले. दीपक खरात (२६, रा. बोकूड जळगाव), असे विष प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो नाट्यशास्त्र विभागाचा (एम.ए. संगीत) माजी विद्यार्थी आहे. विभागाचा माजी विद्यार्थी असल्यामुळे त्याचे तेथे येणे-जाणे होते. सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार याच विभागातील एका विद्यार्थिनीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. तो सतत तिच्या मागावर राहायचा. दीपकच्या त्रासाला कंटाळून सदरील विद्यार्थिनीने गेल्या वर्षी त्याच्याविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात तक्रारही दाखल केलेली आहे. कालही तो विभागात गेला व त्या विद्यार्थिनीसोबत बोलण्याचा त्याने प्रयत्न केला. तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. नैराश्याच्या भरात त्याने काल शुक्रवारी रात्रीच विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आज सकाळी पुन्हा दीपक खरात हा नाट्यशास्त्र विभागात गेला. तेथे त्याने विष प्राशन केल्याचे तैनात सुरक्षारक्षक इम्रान खान याच्या लक्षात आले. इम्रानने सतर्कता दाखवीत तात्काळ विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांना वॉकीटॉकीद्वारे ही माहिती दिली. कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्या परवानगीने परदेशी यांनी तात्काळ एका कारमध्ये दीपक खरात यास टाकून घाटी हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. तेथे त्याचे प्राण वाचविण्यासाठी अतिदक्षता विभागाचे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
एकतर्फी प्रेमातून आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: November 16, 2014 12:15 AM