- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्यातील अकृषी विद्यापीठे प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळे अडचणीत सापडली आहेत. सद्य:स्थितीत ११ अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या १ हजार २८ जागा रिक्त आहेत, तर शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा आकडा ६ हजार ९६९ वर पोहोचला आहे. या रिक्त पदांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि प्रशासन सांभाळणे कठीण झाल्याचे चित्र विद्यापीठांमध्ये निर्माण झाले आहे.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची संयुक्त बैठक ७ एप्रिल रोजी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली होती. या बैठकीत सर्वच कुलगुरूंनी रिक्त पदांची भरती सुरू करावी, प्राध्यापक भरती बंदीतून विद्यापीठे वगळण्याची मागणीही केली होती. यावर राज्यपालांनी विद्यापीठांमधील रिक्त पदे भरण्याची कारवाई तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते; मात्र चार महिन्यांनंतरही याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. अनेक विद्यापीठांमध्ये एक शिक्षकी विभाग कार्यरत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. यामुळे तासिका, संशोधन ठप्प झाले आहे. एम.फिल., पीएच.डी.चे संशोधनही थांबले आहे. ‘नॅक’ मानांकनांसह ‘रुसा’अंतर्गत मिळणारे संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक उपलब्ध नसल्याचा फटका विद्यापीठांना बसत आहे.
रिक्त जागांची आकडेवारी मुंबई विद्यापीठ (३६५) १९६, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई (३४६) १४६, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (३८६) १७०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (२६९) ११२, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर (३४२) १६०, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (१२०) २०, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर २६४ (११५), स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड (१५७) ४२, सोलापूर विद्यापीठ (३७) १३, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (१२०) ३७, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली (३७) १७ अशा जागा रिक्त आहेत. (कंसातील आकडे हे मंजूर पदे असून, पुढील आकडे रिक्त जागांचे आहेत.)
शिक्षकेतर अधिकारी कर्मचारीराज्यातील ११ विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकूण ६ हजार ९६९ पदे रिक्त आहेत. यात अ गटातील अधिकाऱ्यांची ४९८, ब गटातील ४०९, क गटातील ३ हजार ८४९ आणि ड गटातील २ हजार २१३ पदे रिक्त आहेत.
महाविद्यालयांमध्ये ९ हजार रिक्त पदेराज्यातील शासकीय आणि खाजगी संस्थांच्या अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल ९ हजार ५११ पदे रिक्त आहेत. राज्यात प्राध्यापकांची ३४ हजार ५३१ पदे मंजूर आहेत. त्यातील सद्य:स्थितीत कार्यरत पदे २५ हजार २० आहेत. याचवेळी महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ८ हजार ७९८ पदे रिक्त असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागातून देण्यात आली.