छत्रपती संभाजीनगर : शहरातील नामांकित बिल्डर नागपाल पिता-पुत्रास आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी अटक केली. कांचनवाडी परिसरातील एका प्रकल्पातील ग्राहकांकडून 'वन टाइम मेंटेनन्स'चे सुमारे ३ कोटी रुपये हडप केल्याचा त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असतानाच दोन्ही आरोपींना अटक केली.
नागपाल ग्रुपचे प्रमुख रमेश नागपाल, त्यांचा मुलगा नीलकंठ नागपाल अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ते चौकशीत सहकार्य करीत नसल्यामुळे सायंकाळी अटक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. नागपाल प्रोजेक्ट ॲण्ड कन्स्ट्रक्शनद्वारे २०१५ मध्ये कांचनवाडी परिसरात मिडोज हिल मिस्ट नावाने २ बीएचके व रो- हाऊसचा भव्य प्रकल्प आरोपींनी उभारला होता. एकूण १७२ घरांच्या प्रकल्पात फिर्यादी प्रसाद महाजन यांच्यासह जवळपास १६१ ग्राहकांनी घरे खरेदी केली आहेत. या गृहप्रकल्पाचे २०१६ मध्ये कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाले. सोसायटीच्या देखभालीसाठी आरोपींनी वन टाइम मेंटेनन्सच्या नावाखाली फ्लॅटधारकांकडून प्रत्येकी १ लाख ४८ हजार ५२४ रुपये, इलेक्ट्रिसिटी व अन्य कायदेशीर शुल्क म्हणून ५० हजार रुपये घेतले होते. त्यानुसार सर्व सदस्यांचे २ कोटी ९२ लाख ३१ हजार रुपये जमा झाले होते. हे पैसे सोसायटीच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, आरोपींनी दाद दिली नाही.
त्याविषयी सदस्यांनी सहकार विभागाच्या उपनिबंधकाकडे तक्रार नोंदवली. त्यासही केराची टोपली दाखवली. त्यामुळे हतबल झालेल्या सदस्यांच्या वतीने सोसायटीचे अध्यक्ष महाजन यांनी २० फेब्रुवारी रोजी सातारा पोलिस ठाण्यात नागपाल पिता-पुत्रांवर फसवणुकीची तक्रार दिली. यावरून गुन्हा नोंदवून तपास निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार करीत होते. आरोपींना चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांनी सहकार्य केले नसल्यामुळे अखेर अटक केली. या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.