सोयगाव : साखर कारखान्याला उसतोड मजुर पुरवतो, म्हणून २ लाख, ६० हजार रूपये घेऊन तोडीस येण्यास नकार देत फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या १६ जणांविरोधात फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन १५ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, दिनेश बाबुराव मेटे हे इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यात ट्रक वाहतूक व उसतोड मजुर पुरवतात. त्यांनी कारखान्याकडून चार लाख रूपये उचल घेतली व मजुर आणण्यासाठी कजबा पिंपरी ता.जामनेर येथे आले. लल्लु जैैनोद्दिन सय्यद व त्याचे साथीदार यांंच्या सोबत करार करून ११ जोडप्यांना ३५,००० रुपये आगावू रक्कम देण्याचेे ठरवून गाडीत बसवले. अजिंठा गावात गाडी आल्यावर लल्लु जैैनोद्दिन सय्यदने गाडी थांबवली आणि ३ जोडप्यांना येथून घेऊन येतो, असे सांगत पसार झाला. गाडीतील बाकी लोक आम्हाला लल्लु सय्यदने पैसेच दिले नाही म्हणून फरार हाेण्याच्या प्रयत्नात असताना दिनेश मेटे यांनी त्यांना मोठी शिकस्त करून पोलीस ठाण्यात आणले व त्यांच्याविरूद्ध तसेच लल्लू जैनोद्दीन याच्याविरूद्ध तक्रार नोंदविली. फिर्यादीनुसार लल्लु जैैनोद्दिन सैैय्यद व अन्य १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असुन ५ महिला व १० पुरूषांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे पुढील तपास करत आहेत.