केऱ्हाळा ( छत्रपती संभाजीनगर) : सिल्लोड तालुक्यातिल के-हाळा येथे मळणीयंत्र उलटून त्याखाली दबलेल्या एका मजूर महिलेचा मृत्यू झाला झाल्याची घटना मंगळवारी घडली. यात आणखी एक मजूर महिला गंभीर जखमी असून तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. ज्योती कैलास सुरडकर (42) असे मृत मजूर महिलेचे नाव आहे.
मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चालक साबेर बुढण शेख (40) हे के-हाळा शिवारातील शेतकरी शब्बीर रशिद पटेल यांच्या शेतातील मका पिकाची मळणी करण्यासाठी ट्रक्टरवरील मळणी यंत्र घेऊन जात होते. चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरवर बसलेल्या ज्योती कैलास सुरडकर (42) आणि मनिषा नंदकिशोर जाधव या दोन्ही मजूर महिला खाली पडल्या. याचवेळी ट्रॅक्टरला जोडलेले मळणीयंत्र दोघींच्या अंगावर पडले. ग्रामस्थांच्या मदतीने अवजड मळणीयंत्रा खालून दोन्ही मंजूर महिलांना बाहेर काढण्यात आले.
गंभीर जखमी दोन्ही महिलांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. पंरतु रुग्णालयात जात असतानाच फुंलब्री नजिक गंभीर जखमी ज्योती कैलास सुरडकर यांचा मृत्यू झाला. तर दुसरी मजूर महिला मनिषा जाधव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी दिपक नाथाजी सुरडकर ( रा.के-हाळा ) यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालक साबेर बुढण शेख याच्या विरुद्ध बुधवारी दुपारी सिल्लोड ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, बिट जमादार राजु काकडे करत आहेत.