लासूर स्टेशन: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावल्याने राज्यात आंदोलन सुरू झाले आहे. यामुळे लासूर स्टेशन बाजार समितीतील व्यापाऱ्यांमध्ये कांद्याचे भाव गडगडण्याचा संभ्रम निर्माण झाला आहे. बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या बैठकीत कांदा मार्केट गुरुवारी ( दि. २४) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लासूर स्टेशन ( ता. गंगापूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये लिलावासाठी जिल्ह्यातील विविध भागातून शेतकरी कांदा विक्रीसाठी आणतात. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावल्याने कांद्याचे भाव गडगडण्याची भिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात शेतकरी आंदोलन सुरू झाले आहे.
दरम्यान, लासूर स्टेशन येथील कांदा मार्केट सोमवारी ( दि. २१ ) नागपंचमी तर मंगळवारी ( दि. २२) व्यापाऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे बंद होते. तर मंगळवारी सायंकाळी बाजार समिती सभापती, उपसभापती संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत कांदा मार्केट गुरुवारपासून (दि. २४) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सभापती शेषराव जाधव, उपसभापती अनिल चव्हाण, संचालक संतोष जाधव, सुरेश जाधव, प्रकाश मुथा, सुबोध मुथा, संजय केरे, विलास सोनवणे, आप्पासाहेब जगदाळे, नंदकुमार कुकलारे, संभाजी जगताप, भाऊसाहेब चिंधे, सचिव के. आर. रणयेवलेसह आदी व्यापारी उपस्थित होते.