लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मनपा कर्मचाऱ्यांना सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आॅनलाईन मतदार यादीबाबतच्याही सूचना निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी वेगात सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे तांत्रिक प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या सभागृहात राज्य निवडणूक आयोगाच्या समीर गंदपवार आणि नंदलाल कुचे या प्रतिनिधींनी प्रशिक्षण दिले. महापालिका आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना संयुक्तरित्या हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रारंभी आयुक्त गणेश देशमुख यांनी आयोगाच्या प्रतिनिधीचे स्वागत केले. यावेळी निवडणूक विभागाचे उपायुक्त संतोष कंदेवार, अख्तर इनामदार, मोहमद युनूस आदींची उपस्थिती होती. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि आता महापालिका निवडणुकीतही उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. यासाठी निवडणूक विभागाच्या संगणक विभागातील सदाशिव पतंगे, स्वानंद देशपांडे, राजन अय्यर, सोमेश्वर तांबोळी, श्रीकांत जोशी, किशोर दुथडे, गुलाम रसूल, श्याम अटकुले, माधव केळकर, महेश नामूल आणि असदुल्ला खान या मास्टर ट्रेनरना प्रशिक्षण देण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मागणी नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८ उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करावे लागणार आहेत. तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीपदी तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागते. महापालिकेचे २० प्रभाग तयार करण्यात आले असून ३ ते ४ प्रभागासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. त्यामुळे ही संख्या पाहता जवळपास ८ निवडणूक निर्णय अधिकारी लागणार आहेत. त्यात आचारसंहिता पथकाचे प्रमुख म्हणूनही उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी द्यावे लागणार आहेत.
मनपासाठी आॅनलाईन उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:32 AM