घाटीत ऑक्सिजन टँकचे काम पूर्ण
औरंगाबाद : घाटीतील मेडिसिन विभागासाठी अतिरिक्त ऑक्सिजन टँकचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीसाठी आता दोन ऑक्सिजन टँकची सुविधा झाली आहे. लवकरच नव्या टँकद्वारे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे.
अजंठा एक्स्प्रेस ८ दिवस काचीगुडाहून सुटणार
औरंगाबाद : सिकंदराबाद रेल्वेस्टेशनवर ऑटोमेटिक कोच वाॅश प्लांटची सुविधा सुरू करण्यासाठी ८ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मनमाड-सिकंदराबाद - मनमाड अजंठा एक्स्प्रेस ८ दिवस सिकंदराबादऐवजी काचीगुडा रेल्वेस्टेशनवरून धावणार आहे. मनमाड ते सिकंदराबाद अजंठा एक्स्प्रेस १६ मार्च ते २३ मार्चदरम्यान सिकंदराबादऐवजी काचीगुडा रेल्वेस्टेशनवर जाईल. तर सिकंदराबाद ते मनमाड अजंठा एक्स्प्रेस १७ मार्च ते २४ मार्चदरम्यान सिकंदराबादऐवजी काचीगुडा रेल्वेस्टेशनहून सुटेल. तसेच पूर्णा ते नांदेडदरम्यान काही रेल्वे फाटकावर भुयारी पूल बनविण्यासाठी आर.सी. सी. बॉक्स टाकण्यात येणार आहेत. यामुळे दिनांक १६ मार्च रोजी परभणी ते नांदेड विशेष रेल्वे पूर्णा ते परभणीदरम्यान १३५ मिनिटे उशिरा धावेल.