औरंगाबाद : भवितव्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना जसे शाळा- महाविद्यालयांचे वर्ग करावे लागतात, तसेच प्राध्यापकांनाही आपल्या करिअरसाठी उद्बोधन वर्ग करावेच लागतात. लॉकडाऊनच्या काळात विद्यापीठाच्या मनुष्यबळ विकास केंद्राच्या वतीने ऑनलाईन १५ कोर्ससाठी तब्बल ५०० प्राध्यापकांनी हजेरी लावली.
विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत देशातील ६५ विद्यापीठांमध्ये मनुष्यबळ विकास केंद्रे चालविली जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील ३० वर्षांपासून हे केंद्र चालविले. यंदा ‘कोविड‘च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष वर्गात सुरू असणारे कोर्सेस १५ मार्च २०२० बंद होते; मात्र सप्टेंबरपासून कुलगुरु डॉ. प्रमोद येवले व सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन कोर्सेस सुरू करण्यात आले. या काळात चार उद्बोधन वर्ग तसेच भाषिक साहित्य व संस्कृती अभ्यास, पर्यावरण अभ्यास, माहिती संवाद तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र, मानवी हक्क आणि सामाजिक सहभाग ताणतणाव व्यवस्थापन, जैविक तंत्रज्ञान व संभाषण कौशल्ये, आपत्ती व्यवस्थापन या विषयावर उजळणी वर्गांचे आयोजन करण्यात आले. या कोर्सेससाठी मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठांतून ३५० प्राध्यापक सहभागी झाले, तर राज्यातील अन्य विद्यापीठातून १३८ तसेच परराज्यातील ५२ प्राध्यापकांनी हजेरी लावली.
या ऑनलाईन वर्गामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील २७८, परराज्यातील १२१, तर विदेशातील ११ अशा एकूण ४१० तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केल्याचे मनुष्यबळ केंद्राचे संचालक डॉ.एन.एन.बंदेला व डॉ.मोहम्मद अब्दुल राफे यांनी सांगितले.