आता वार्षिक परीक्षा होऊन पुन्हा शाळांना सुट्या लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, या सुटीत दररोज एक पान सुवाच्च हस्ताक्षरात लिहिण्याचा प्रयत्न करा आणि लिखाणाची गती हळूहळू वाढवत न्या, असा सल्ला तज्ज्ञ मंडळींनी दिला आहे. याशिवाय पालकांनीही विद्यार्थ्यांच्या लेखनाकडे आवर्जुन लक्ष द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
चौकट :
मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात...
१. लेखन हे एक कौशल्य आहे. म्हणूनच इतर कौशल्यांप्रमाणेच लेखनाचा सरावही अत्यंत आवश्यक असतो. किंबहुना सातत्यपूर्ण सराव हाच लेखन कौशल्याचा आत्मा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचा स्वाध्याय, गृहपाठ यामध्ये खंड पडलेला असल्याने त्याचाही लेखनाच्या वेगावर परिणाम झाला आहे
- प्रा. नागेश अंकुश
२. अक्षरांची जागा माऊसचे क्लिक घेऊ शकत नाही. त्यामुळे यावर्षी कोरोनाच्या अपरिहार्य कारणामुळे शिक्षणाचे माध्यम जरी बदलले असले तरी उत्तम हस्ताक्षराला मात्र पर्याय नाही, त्यामुळे केवळ मनाेरंजनासाठी का होईना, पण विद्यार्थ्यांनी लिखाण आवर्जून करावे.
- डॉ. हंसराज जाधव
चौकट :
विद्यार्थ्यांनो हे करा-
१. लिखाणाशी पुन्हा गट्टी जमविण्यासाठी मुलांनी त्यांना आवडणाऱ्या गोष्टींचे लिखाण करण्यास सुरुवात करावी.
२. एकदम खूप लिखाण न करता दररोज ठराविकच, पण सातत्यपूर्ण लिखाण नियमित करावे. चुका टाळण्यासाठी काही दिवस हे लिखाण शक्यतो बघूनच करावे.
३. पालकांनीही मुलांजवळ बसून त्यांच्या लिखाणात, अक्षरांच्या वळणांमध्ये बदल झाला आहे का, हे आवर्जून तपासावे.
चौकट :
पालकांचे मत
१. लिहिण्याचा सराव कमी झाल्यामुळे मुलांच्या शुद्धलेखनाच्या भरपूर चुका होत आहेत. मुलांना लिहिण्याचा कंटाळा येत असून, त्यांची लिखाणाची गतीही खूपच कमी झाली आहे. आता तर मुले काही शब्द संक्षिप्त रूपातही लिहू लागले आहेत.
- स्नेहा भालेराव
२. ऑनलाइन शिक्षणामुळे मुले मागील एक वर्षापासून केवळ ऐकत आहेत. यामध्ये लिखाणाचा सराव आपोआपच कमी झाला असून, मुलांसाठी लिखाण म्हणजे कंटाळवाणी गोष्ट झाली आहे. याचा परिणाम मुलांच्या हस्ताक्षरावर झाला आहे.
- प्रीती लखोटिया