औरंगाबाद : सोशल मीडियावर भेटलेल्या कथित जर्मन मित्राने पाठवलेले गिफ्ट दिल्ली विमानतळावर आले असून यात युरो, डॉलर आणि सोने आहे, अवैध मार्गाने हा ऐवज आणल्यामुळे मनी लाँड्रींगची केस होऊ शकते, अशी धमकी देऊन १२ लाख रुपये आणि गिफ्ट सोडविण्यासाठी दंडाच्या नावाखाली १० लाख रुपये ऑनलाईन उकळून एका महिलेला तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकारानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सिडको परिसरातील महिला पतीपासून विभक्त राहतात. त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही महिन्यांपूर्वी फेसबुक या सोशल मीडियावर त्यांची ओळख जर्मन व्यक्तीसोबत झाली. दरम्यान त्यांच्यात ऑनलाईन मैत्री झाली आणि ते व्हॉट्सॲपवर चॅटिंग करू लागले. काही दिवसापूर्वी त्याने तिला एक गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. ती नको म्हणत असताना त्याने तिचा पत्ता विचारून गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. चार दिवसानंतर एका महिलेने त्यांना फोन करून ती दिल्ली विमानतळ येथील कस्टम अधिकारी असल्याचे तिने सांगितले. तुमचे जर्मनीहून पार्सल आले असून त्यात युरो, डॉलर आणि सोने आहे. या वस्तू विनापरवानगी मागवल्याने तुमच्यावर मनी लाँड्रिंगची केस होऊ शकते असे सांगितले. तक्रारदार यांनी विनवणी केल्यावर त्या महिलेने आणि अन्य आरोपींनी केस न करण्यासाठी लाच म्हणून तब्बल १२ लाख ऑनलाईन उकळले. यानंतर त्यांनी हे पार्सल सोडविण्यासाठी कस्टम ड्युटी(अबकारी कर ) म्हणून १० लाख रुपये ऑनलाईन बँक खात्यात पाठविण्यास सांगितले. कोट्यवधीचे गिफ्ट असल्यामुळे त्यांनी पुन्हा १० लाख रुपये ऑनलाईन पाठवले. नंतर त्यांना पुन्हा पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी तिच्या जर्मन मित्राला कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
बनावट मोबाईल नंबरचा वापर
सायबर गुन्हेगार ओळ्ख लपविण्यासाठी आणि ते विदेशातून बोलत आहेत, असे दाखविण्यासाठी इंटरनेटवरून विशिष्ट अंकाचा मोबाईल क्रमांक घेतात आणि कॉल करतात. असाच वापर महिलेच्या कथित जर्मन मित्राने केल्याचे समोर आले.