बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील विविध भागांत आॅनलाईन जुगाराचा धंदा जोरात सुरू झाला आहे. काही ठिकाणी जुन्या लॉटरी सेंटरमध्ये तर काही ठिकाणी गल्लीबोळातील लहान-मोठ्या दुकानांत सुरू झालेल्या या जुगाराला राजकीय वरदहस्त असल्याने पोलीस ‘कित’पत कारवाई करतात, याबाबत शंका उपस्थित होत आहे.गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध भागांत आॅनलाईन जुगारांचे अड्डे सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे हे अड्डे नाशिक येथून आलेल्या एका व्यक्तीने शहरातील एका माफियाच्या मदतीने सुरू केले. या व्यक्तीवर एका राजकीय पदाधिकाऱ्याचा वरदहस्त आहे. एखाद्या कॉॅर्पोरेट कंपनीप्रमाणे ही मंडळी शहरातील जुगार अड्ड्यांवर नियंत्रण ठेवत आहेत. त्यांचा हिशेब रोजच्या रोज रोखीने केला जातो. यात रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा अड्डा सकाळी १० वाजता सुरू झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. विशेषत: किराडपुरा, कैलासनगर, जुना मोंढा जाफरगेट परिसर, टीव्ही सेंटर परिसर, मिसरवाडी, अंगुरीबाग, चेलीपुरा, जिन्सी परिसर, वाळूज परिसरातही हे अड्डे कार्यान्वित आहेत. छावणी, पडेगाव आणि भावसिंगपुरा परिसरात आॅनलाईन जुगार सेंटर सुरू करण्यासाठी काही लोकांनी गाळे भाडेतत्त्वावर घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. सुमारे ४५ ते ५० ठिकाणी सध्या आॅनलाईन जुगारांचे अड्डे सुरू आहेत.बाहेरून लॉटरी, आत चक्रीआॅनलाईन लॉटरीवर शासनाने २८ टक्के जीएसटी लावला आहे. जीएसटी सुरू झाल्यापासून आॅनलाईन लॉटरीचा धंदा बसला आहे. ग्राहकांनी आॅनलाईन लॉटरीकडे पाठ फिरविल्याचे पाहून काही लॉटरी सेंटरचालकांनी आता आॅनलाईन जुगार सेंटरची फ्रॅन्चायजी घेतली. परिणामी बाहेरून लॉटरी सेंटर दिसत असले तरी आत मात्र आॅनलाईन चक्री फिरत राहते. यावर जीएसटी नसल्याने जुगाºयांची संख्या वाढत आहे.स्पीन अॅण्ड वीन नावाचा जुगारस्पीन अॅण्ड वीन नावाचाही आॅनलाईन जुगार आता खेळविण्यात येत आहे. हा जुगार खेळविण्यासाठी व्हॉटस्अॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून या जुगाराची लिंक (संगणकीय पत्ता) पाठविण्यात येतो. ती लिंक ओपन करताच जुगाराचे चक्र मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते. तुम्हाला एक बक्षीस देण्यात येणार असल्याचा मेसेज येतो. हे बक्षीस मिळविण्यासोबतच आणखी कॉईन प्राप्त करण्यासाठी त्यांच्या व्हॉटस्अॅपच्या १५ मित्रांना ‘स्पीन अॅण्ड वीन’ची लिंक पाठविण्याचे सांगितल्या जाते. या आॅनलाईन जुगाराचे अप्लिकेशन तयार करण्यासाठी तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. स्पीन अॅण्ड वीनची लिंक पंधरा जणांना न पाठविल्यास अथवा हा जुगार ओपन न ठेवल्यास मोबाईल हॅँग होतो. परिणामी एकतर लिंक इतरांना पाठवाव्या लागतात अथवा मोबाईलमधील इंटरनेट कनेक्शन बंद करणे, असे दोन पर्याय मोबाईलधारकांकडे आहेत. आॅनलाईन जुगार ओपन झाल्यानंतर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर जुगार खेळा असे सांगितल्या जाते.आॅनलाईनच्या जुगार सेंटरची ६० हजारात फ्रँचायझीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुगाराच्या या आॅनलाईन अड्ड्याच्या फ्रँचायझी ६० हजार रुपयांत गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांना देण्यात आल्या आहेत. यात १५ हजार रुपये संगणकासाठी, तर १५ हजारांचे क्वॉईन आणि ३० हजार रुपये डिपॉझिटचा समावेश आहे.ही रक्कम दिल्यानंतर आॅनलाईन सेंटर सुरू करण्यासाठी संगणक आणि सॉफ्टवेअर पुरविण्यात येते. एवढेच नव्हे तर पोलिसांची त्यांच्यावर कारवाई होणार नाही, याची हमीही देण्यात येते. फ्रँचायझीचालक बिनधास्तपणे शहरातील विविध ठिकाणी दुकानात आणि घरात आॅनलाईन जुगार खेळवीत आहेत.
औरंगाबाद शहरात सर्रास सुरू आॅनलाईन जुगार अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:54 AM
शहरातील विविध भागांत आॅनलाईन जुगाराचा धंदा जोरात सुरू झाला आहे. काही ठिकाणी जुन्या लॉटरी सेंटरमध्ये तर काही ठिकाणी गल्लीबोळातील लहान-मोठ्या दुकानांत सुरू झालेल्या या जुगाराला राजकीय वरदहस्त असल्याने पोलीस ‘कित’पत कारवाई करतात, याबाबत शंका उपस्थित होत आहे.
ठळक मुद्देराजकीय वरदहस्त : पोलीस ‘कित’पत कारवाई करतात याबाबत शंका