आळंद : फुलंब्री तालुक्यातील आळंद-नायगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या ऑनलाइन ग्रामसभेस विविध विभागांचे शासकीय कर्मचारी सहभागी झाले नाहीत, तसेच ऑफलाइन सभा घेण्याच्या मागणीवरून गोंधळ वाढल्याने शेवटी ही ग्रामसभा रद्द करण्यात आली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याने शासनाने ग्रामसभा ऑनलाइन घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे शनिवारी सरपंच भारती शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता ऑनलाइन ग्रामसभेस सुरुवात करण्यात आली. अध्यक्षांच्या परवानगीने माजी उपसरपंच व सदस्य जगन दाढे यांनी ऑनलाइन सभेत येणारे विषय वाचून दाखविले. मात्र, या ग्रामसभेसाठी आरोग्य विभाग, महावितरण, जिल्हा परिषद शाळा, महसूल विभाग यांच्यासह ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित असल्याने ऑनलाइन सहभागी असलेल्या ४८ ग्रामस्थांनी यावर आक्षेप घेऊन ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे कोणत्याही विषयावर सविस्तर चर्चा न होताच ही ग्रामसभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. एकीकडे जिल्हाभरात ऑफलाइन ग्रामसभा घेण्यात येत असताना आळंद-नायगव्हाण ग्रामपंचायतने ऑफलाइन ग्रामसभा का घेतली नाही, यावरही अनेक ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. जर प्रत्यक्ष ग्रामसभा झाली नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वाक्षरीचे निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
050921\img-20210905-wa0241.jpg
फोटो ओळ:आळंद-नायगव्हान ग्रामपंचायतच्या ऑनलाईन ग्रामसभेत सहभागी झालेले पदाधिकारी.