जागवल्या आठवणी : चारोळ्या, गाण्यांतून व्यक्त झाले विद्यार्थी
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाकडून शुक्रवारी एमफिल आणि एमएच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन निरोप देण्यात आला. विभागातील आठवणी, ज्ञानाची शिदोरी, मित्र-मैत्रिणींची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन याबद्दल विद्यार्थी- शिक्षक चारोळ्या, गाण्यांतून व्यक्त झाले. विभागप्रमुख डॉ. एस. एस. नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह कर्मचारी उपस्थित होते.
वैष्णवी लोखंडे या विद्यार्थिनीने चारोळी, किरण अंभोरे व अनुराग मुळी या विद्यार्थ्यांनी अनुभवाद्वारे विद्यापीठातील आठवणींना उजाळा दिला. सोमेश्वर मोगरे या विद्यार्थ्याने ‘काय आठवेल’, या कवितेतून विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत जुळलेली नाळ व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षीय समारोपात डॉ. नरवडे यांनी आजची विद्यार्थ्यांची दशा ही त्यांच्या भविष्यातील दिशा ठरवते, यावर भाष्य केले. भाग्यश्री नाईकवाडे, अश्विनी काळे, साक्षी धरमपल्ली यांनी गाणे गात आपली भावना व्यक्त केली. ‘जीवन झाले ओझे गं’, ही कविता सादर करताना आरती होगे या विद्यार्थिनीने सर्वांची मने जिंकली. अलका बोडखे या विद्यार्थिनीने चारोळीद्वारे जीवनप्रवास मांडला. सूत्रसंचालन नागार्जुन रगडे व साक्षी धर्मपल्ली यांनी केले, तर आभार प्रिया गंगावणे यांनी मानले.