औरंगाबाद : विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाहासाठीची नोटीस आॅनलाईन देण्याची सुविधा १ आॅगस्टपासून उपलब्ध होणार आहे. १ आॅगस्टपासून आॅनलाईन नोटीस देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विशेष विवाह कायदा १९५४ नुसार विवाह करण्यासाठी इच्छुक वधू-वरांनी नियोजित विवाहाची नोटीस, वय, रहिवास या पुराव्यांच्या कागदपत्रांसह संंबंधित जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्यांकडे शुल्कासह सादर करावी लागते. इच्छुक वधू-वर अटींची पूर्तता करीत असल्यास विवाह अधिकारी नोटीस स्वीकारून त्याची प्रत नोटीस बोर्डावर लावतात. तसेच त्यांचे पत्ते ज्या जिल्ह्यातील असतील, तेथील अधिकाऱ्याकडे एकेक नोटीस पाठविली जाते. ही पद्धती सध्या प्रचलित आहे. यापुढे आॅनलाईन नोटीसनुसार विवाह इच्छुकांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विवाह आॅनलाईन नोटीससाठी नागरिकांना सुविधेसाठी स्वतंत्र संगणक व इतर साहित्य मार्गदर्शक, आॅपरेटर्स मोफत उपलब्ध असतील.
जिल्हा विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत नियोजित विवाहाबाबत आक्षेप न आल्यास त्यापुढील ६० दिवसांत विवाहइच्छुक व तीन साक्षीदारांसह विवाह अधिकाऱ्यांसमक्ष विवाह होतो. त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. सध्या ही प्रक्रिया आॅफलाईन सुरू होती. यापुढे आॅनलाईन सुविधेचा नागरिकांनी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.