- राम शिनगारे
औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्या दिल्या आहेत. या काळातही विद्यार्थ्यांच्या अध्यापन अन् अध्ययनात खंड पडू नये, यासाठी जि. प. प्राथमिक शाळा बजाजगेट वळदगाव येथील शिक्षकांनी अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना झूम अॅप, स्काईप, गुगल आणि व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून आॅनलाईन अध्यापन केले जात आहे.
१० वर्षांपासून बंद असलेली बजाजगेट येथील जि. प. प्राथमिक शाळा मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आली. वर्षभरामध्येच ही शाळा प्रयोगशील म्हणून नावारुपास आली आहे. उद्योजकांकडून सीएसआर फंडातून निधी मिळाल्यामुळे शाळेत तंत्रज्ञानाची उपकरणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. या तंत्रज्ञानाच्या वापरात विद्यार्थी पारंगत झाल्यामुळे त्यांनी अमेरिकेतील विद्यार्थ्यांशीही अनेक वेळा ‘इम्पाटिको’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवाद साधला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुख्याध्यापक विजय लिंबोरे यांनी मंगळवारपासून (दि.१७) अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यात विद्यार्थ्यांना वेळेवर आॅनलाईन अध्यापन करण्यात येत आहे. यासाठी झूम अॅप, स्काईप आणि व्हॉटस्अॅपचा वापर करण्यात येत आहे. सकाळी ८ ते ९.४५ या वेळेत झूम अॅपवरून परिपाठ व मराठी विषयाची चर्चा आणि स्वअभ्यास दिला जातो. याच वेळी विद्यार्थ्यांना गृहपाठही देण्यात येत आहे. सकाळी १०.३० ते ११.१५ यावेळेत गणित विषयाचे अध्यापन, चर्चा, स्वअभ्यास नियोजनाच्या सूचना आणि गृहपाठ देण्यात येतो. सायंकाळी ६ ते ६.४५ या वेळेत विद्यार्थ्यांची विषयावर चर्चा व उपक्रम आधारित अभ्यासावर मार्गदर्शन केले जात असल्याचे मुख्याध्यापक विजय लिंबोरे यांनी सांगितले. दिवसभरात केलेल्या अभ्यासाची माहिती गुगलवर आॅनलाईन लिंक देऊन घेतली जाते. तसेच गृहपाठ केल्याचा पुरावा व्हॉटस्अॅपवर मागविला जातो. विद्यार्थ्यांना काही अडचणी निर्माण झाल्यास यूट्यूब आणि गुगलचा आधार घेण्याचा किंवा फोनवरून संपर्क साधण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पालक विद्यार्थ्यांना काहीवेळासाठी मोबाईल देतातआमच्या जि. प. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे पालक काही वेळेसाठी मोबाईल देतात. शाळा बंद झाल्यानंतर या पालकांनाच विनंती करून विद्यार्थ्यांच्या अध्यापन, अध्ययनासाठी अधिक वेळ मोबाईल देण्याची विनंती केली आहे. त्यास पालकांनीही प्रतिसाद दिला आहे.-विजय लिंबोरे, मुख्याध्यापक
शिक्षण विभाग सहकार्य करणारशाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आॅनलाईन अध्यापनाला सुरुवात केली आहे. हा स्तुत्य उपक्रम विविध शाळांमध्ये शिक्षकांना राबवता येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास शिक्षण विभाग तयार आहे. शिक्षकांनी पुढे आले पाहिजे.- सूरजप्रसाद जयस्वाल, प्राथमिक शिक्षणाधिकारी