छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांपूर्वीच किरायाने राहायला आलेल्या मायकेल सायमन डिसूझा (वय अंदाजे २५, रा. लक्ष्मी कॉलनी) याने परिसरातल्या नऊ जणांना विविध आमिष दाखवले. मोबाइलची एजन्सी, स्वस्तात टीव्ही, वॉशिंग मशीन देण्याचे प्रलोभन दाखवून २२ लाख ८९ हजार रुपये उकळून सामानासह पसारही झाला. तो खोली साेडून मोबाइल बंद करून पसार झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात आले. मंगळवारी छावणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सचिन जनार्दन कांबळे (रा. संगीता कॉलनी) यांच्या मायकल ओळखीचा होता. काही दिवसांपूर्वीच मायकल लक्ष्मी कॉलनीत राहण्यासाठी आला होता. त्याने पूर्विका मोबाईल कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले होते. गोड बोलून त्याने काही दिवसांमध्येच परिसरातल्या लोकांचा विश्वास जिंकला. पूर्विका मोबाईल कंपनी एजन्सीसाठी लोक शोधत असून भागीदार झाल्यास दामदुप्पट परताव्याचे आमिष त्याने कांबळे यांच्यासह इतरांना दाखवण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. शिवाय, इलेक्ट्रॉनिक कंपन्यांमध्ये ओळख असल्याचे सांगून परिसरातील लोकांना माफक दरात नामांकित कंपन्यांचे टीव्ही, वॉशिंग मशिन देण्याचे आमिष दाखवले.
काही दिवस त्याची आईदेखील त्याच्या घरी राहण्यास आल्याने लोकांचा अधिकच विश्वास बसला. त्याने दोन महिन्यांमध्ये २२ लाख ८९ हजार रुपये गोळा केले व आठवड्यापूर्वी पसार झाला. खोली सोडून गेल्यानंतर त्याचे मोबाइलदेखील बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी ठाण्यात धाव घेतली. उपनिरीक्षक गणेश केदार तपास करत आहेत.