औरंगाबाद : १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार (दि.२३) रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यातील ११ आठवडी बाजार बंदच होते. शिवाय जाधववाडी व जुन्या मोंढ्यातील दुकानांचे शटरही आज उघडले नाही. बाकीच्या बाजारपेठेत दुकाने उघडी होती; पण दिवसभरात १०० ते १५० कोटींची उलाढाल होत असते. मात्र, आज अवघा २० टक्केच व्यवसाय झाला.
लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा मतदानाचा दिवस होय. मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून जिल्ह्यात दर मंगळवारी भरणारे ११ आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्वात मोठा धान्याचा अडत बाजार जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ९ मतदान केंद्रे होती. यामुळे येथील धान्याचा अडत व्यवहार व्यापाऱ्यांनी बंद ठेवला होता. सेलहॉलची लोखंडी गेटही उघडण्यात आली नाहीत.
जुन्या मोंढ्यातही हीच परिस्थिती दिसून आली. बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानांचे शटर उघडलेच नाही. व्यापाºयांनी सांगितले की, सध्या वार्षिक धान्य खरेदीचा हंगाम सुरू आहे. जाधववाडी व जुना मोंढा मिळून दररोज १० ते १५ कोटींची उलाढाल होत असते. आज संपूर्णपणे उलाढाल ठप्प होती. याशिवाय शहरातील कापड बाजारात लग्नसराईमुळे दररोज वर्दळ असते; पण ही वर्दळ आज दिसली नाही.
कपड्यांची दुकाने उघडी होती; पण बस्ता खरेदीसाठी वºहाडी दिसून आले नाहीत. सराफा बाजारातही व्यापारी दिवसभर ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. कारण, मतदानामुळे ग्रामीण भागातील ग्राहकही आज शहरात खरेदीसाठी आले नाहीत. जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले की, दररोज शहरात बांधकाम व्यवसाय सोडता अन्य व्यवसाय मिळून १०० ते १५० कोटींची उलाढाल होत असते. आज दिवसभर उलाढाल कमी झाली. सायंकाळनंतर बाजारात ग्राहक दिसून आले. एकंदरीत ८० टक्के व्यवसाय कमी झाला.