फुलंब्री तालुक्यातील चित्र : शंभर शिक्षकांनी तर लसीकरण केले नाही
फुलंब्री : तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ २५ टक्केच आहे, तर शंभर शिक्षकांनी तर लसींचा एकही डोस घेतलेला नाही, असे अहवालावरून समोर आले आहे.
फुलंब्री तालुक्यात गेल्या दीड वर्षाच्या कोरोना काळात १,७९० लोकांना कोरोनाची लागण झाली, तर कोरोनामुळे ९६ लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्यावतीने अहोरात्र मेहनत करण्यात आली. जनजागृती असो अथवा लसीकरण या कामात आरोग्य विभाग कायम सक्रिय होता; पण त्यांना नागरिकांकडून हवे असलेले सहकार्य मिळत नाही. सुरुवातीला तपासणी करण्यासाठी लोक पुढे येत नव्हते. आता लसीकरणासाठीही अशीच परिस्थिती आहे. त्यात पहिला डोस घेतलेले नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी येताना दिसून येत नाही.
----
फुलंब्री तालुक्यात आतापर्यंत ५२ हजार ५३५ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला, तर दुसरा डोस केवळ १४ हजार २९८ लोकांनीच घेतलेला आहे. पहिला डोस घेतलेले नागरिकांनी दुसरा डोस घेण्याकडे पाठ फिरविली आहे. या लसीपासून शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. असा चुकीचा गैरसमज नागरिकांत पोहोचला आहे.
--
तालुक्यात जि. प. २०३ शाळा, तर खासगी शाळा ९५ आहेत. यात १३४७ शिक्षक कार्यरत आहेत. यातील १०४३ शिक्षकांनी दोन डोस घेतले, तर २२१ शिक्षकांनी केवळ एकच डोस घेतले. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे ११६ शिक्षक व कर्मचारी यांनी अद्यापही एकही डोस घेतलेला नाही. अशा शिक्षकांना शाळेवर प्रतिबंध का घातलेला आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
------
जिल्हा परिषद असो अथवा खासगी शाळा यात कार्यरत असलेल्या ज्या शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे एकही डोस घेतले नाही किंवा दुसरा डोस घेतला नाही. अशा शिक्षकांना यापूर्वीच सूचना देण्यात आलेल्या आहेत. - अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी