- श्रीकांत पोफळेकरमाड : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे आले. मात्र, तत्काळ हे पैसे खात्यातून पैसे कमी करण्यात आल्याने या बँकेतील बहिणींना मुख्यमंत्र्यांच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. कमी केलेली रक्कम तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हा थेट खात्यावर जमा होत असल्याने करमाड पंचक्रोशीतील अनेक महिलांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत बचत खाते उघडले. काही लाभार्थ्यांचे बचत खाते हे जुनेच आहे, तर काही खाती ही शासनाच्या झिरो बॅलन्स योजनेत देखील उघडलेली आहेत. त्यामुळे या खात्यावर मिनिमम बॅलेन्स मेंटेन करणे हा नियम बंधनकारक नाही. असे असताना देखील अनेक महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले पैसे तत्काळ कपात केल्याने अनेक महिला हवालदिल झाल्या.
खात्यातून कमी झालेल्या पैशाची वेगवेगळी कारणे बँकेतून सांगण्यात येत आहेत. अनेकांना बचत खात्यात मिनिमम बॅलन्स मेन्टेन केले नसल्याने त्याची फीस म्हणून हे पैसे कमी केल्याचे सांगण्यात आले, तर काही महिलांना आपण खाते उघडले तेंव्हा अटल पेन्शन योजना आपल्याला देण्यात आली होती. या योजनेचा हप्ता घेण्यासाठी खात्यात पैसे नव्हते, खात्यात जेव्हा पैसे आले तेंव्हा हप्ता म्हणून ही रक्कम कमी केल्याचे सांगण्यात येत आहे.
४५०० पैकी फक्त २९ रुपये शिल्लक मी खाते उघडले त्यावेळी कुठल्याही पेन्शन योजनेची माहिती मला देण्यात आली नाही किंवा त्या स्वरूपाचा अर्ज मी भरलेला नाही. मात्र, माझ्या खात्यावर आलेले ४५०० पैकी फक्त २९ रुपये माझ्या खात्यावर शिल्लक ठेवले आणि अटल पेन्शन योजनेचे पैसे कमी केल्याचे मला बँकेतून सांगण्यात आले. - आफरीन परवेज शेख, करमाड
काम बुडवून बँकेत आलेमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर आले, ते पैसे काढण्यासाठी मी दोन वेळा काम बुडवून बँकेत आले. मात्र, माझ्या खात्यावर जमा झालेल्या पैशातून बँकेने काही रक्कम कमी केली. कुठल्या कारणासाठी ही रक्कम कमी केली किंवा ही रक्कम परत मिळणार आहे का? याची मला कुठलीही माहिती दिलेली नाही.- सविता बबन कुबेर, गेवराई कुबेर
सर्वांचे पैसे परत करणार...लाभार्थी महिलांच्या खात्यातून कमी झालेल्या पैशाबाबत माझे हेड ऑफिस सोबत बोलणे झालेले आहे. या सर्व महिलांकडून आम्ही लेखी अर्ज घेऊन त्यांचे पैसे पुन्हा त्यांच्या खात्यात वर्ग करू. ज्यांचे ज्यांचे पैसे खात्यातून कमी झाले त्या सर्वांनी बँकेत लेखी अर्ज करावा. - इनामदार, शाखा व्यवस्थापक,महाराष्ट्र ग्रामीण बँक, करमाड.