लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणात अर्धा पावसाळा संपत आला तरी केवळ ३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. परिणामी अर्ध्या मराठवाड्याला पाणीटंचाईला तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाने नंतर मात्र विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणात केवळ ३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. येलदरी धरणाच्या नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार येलदरी धरणाची आजमितीस ४४८.६५५ मीटर एवढी पाणीपातळी आहे. यामध्ये १५०.२२० दलघमी एवढा एकूण पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे. परंतु, यापैकी केवळ २५.५४३ दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा धरणात उपलब्ध झाला आहे. याची टक्केवारी केवळ ३.१५ टक्के एवढी येते. धरण परीक्षेत्रात ७ जून ते १७ जुलैपर्यंत २८३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी हेच प्रमाण ३०९ मि.मी. एवढे होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत दीड महिन्याच्या कालावधीत यंदा कमी पाऊस झाल्याचे ंिचत्र पहावयास मिळत आहे. पाऊस नसल्याने परिसरातील ओढे, नाले तसेच नद्यांना देखील पाणी आलेले नाही. परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. येणाऱ्या काही दिवसात येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास अर्ध्या मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
येलदरी धरणात केवळ ३ टक्केच पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:06 AM