औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणा अलर्ट होऊन खबरदारी घेत आहे. पण जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ ४ बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय तिसऱ्या लाटेचा मुकाबला कसा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढली. रोज ऑक्सिजन येत होता आणि संपत होता, अशी स्थिती होती. जिल्हा रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँकचे काम हाती घेण्यात आले. परंतु दुसऱ्या लाटेत या ऑक्सिजन टँकचा वापरच झाला नाही. आता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पही उभा करण्यात आला आहे. ऑक्सिजनच्या दृष्टीने रुग्णालय सक्षम झाले आहे. पण याशिवाय जिल्हा रुग्णालयात तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने अद्याप काहीही कामे झालेली नाहीत. केवळ कागदोपत्री नियोजन झालेले आहे. याठिकाणी बालकांच्या उपचारासाठी ५० आयसीयू बेड, व्हेंटिलेटरचे नियोजन करण्यात आले आहे. पण उपचार करणाऱ्या तज्ज्ञांचा मोठा प्रश्न आहे. कारण जिल्हा रुग्णालयात केवळ ४ बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे बालकांच्या उपचारासाठी तज्ज्ञांच्या कमतरतेला रुग्णालयाला सामोरे जावे लागणार आहे. तज्ज्ञ डाॅक्टर मिळणेही अवघड असल्याने गंभीर प्रकृती होणाऱ्या बालकांच्या उपचाराचा भार घाटीवरच पडण्याची स्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात बालकांच्या उपचाराची व्यवस्था सक्षम करण्याची मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.
नियोजन सुरु, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
जिल्हा रुग्णालयात ४ बालरोगतज्ज्ञ आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकांवर उपचार करण्यात आलेले आहे. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने नव्या बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही दिले जात आहे. लहान मुलांच्या उपचारासाठी आयसीयू बेडचे, व्हेंटिलेटरचेही नियोजन करण्यात आले आहे.
- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक