औरंगाबाद : राज्य पुरातत्व विभागाच्या मराठवाड्यातील १८० स्मारकांच्या देखरेखीचा भार केवळ ४२ जणांवर आहेत. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे समाजसेवी संस्थांनी मनुष्यबळ पुरवल्यास मराठवाड्यातील स्मारकांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मदत होईल, असे राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अजित खंदोरे यांनी सांगितले.
राज्य पुरातत्व विभागांतर्गत मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक ४२ स्मारके औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. जालना येथे ४, बीडला २२, परभणी येथे ३०, उस्मानाबाद २८, हिंगोली २०, नांदेड ३६ तर लातूर जिल्ह्यात ५ स्मारके आहेत. अनेक स्मारके जीर्ण झाली असून यातील ४० ते ४५ स्मारकांवर पुर्णवेळ केवळ ४२ माणसे देखभाल करण्यासाठी आहेत. मनुष्यबळाची कमतरता असल्याने दुरूस्तीवर जास्त खर्च करावा लागतो. मनुष्यबळाची उपलब्धता करून दिल्यास स्मारके निगराणीत राहतील आणि दुरूस्तीचा खर्च कमी करता येईल, असे इतिहास तज्ञांचे मत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील लेणीच्या संवर्धनाचे ३५ लाखांचे काम सध्या सुरू आहे. पैठण येथील स्तंभाचे संवर्धन व सौंदर्यीकरणाचे ८० लाखांचे काम सुरू आहे. तसेच १० ते १२ मोठ्या संवर्धन कामांसाठी १५ कोटींचा प्रस्ताव शासनाला पाठवला असून त्यात १० दरवाजे, लाल हरदौल समाधी, उदगीर किल्ला, औसा येथील किल्ला या कामांचा समावेश असल्याचेही खंदारे यांनी सांगितले.