- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : केंद्र सरकारने मक्याचा हमीभाव १७०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे; मात्र जिल्ह्यातील ४३४ शेतकऱ्यांनाच या हमीभावाचा फायदा मिळाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, शासकीय खरेदी केंद्रावर १२२३ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. उर्वरित शेतकऱ्यांपैकी काहींनी अजून मका घरातच ठेवला आहे, तर काहींनी अडत बाजारात विकला आहे.
औरंगाबाद जिल्हा मका उत्पादनात २०१४ यावर्षी राज्यात ‘नंबर वन’ ठरला होता. त्यावर्षी १ लाख ६९ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात ७ लाख ३७ हजार ४४१ टन उत्पादन झाले होते. जिल्ह्यात सिल्लोड, कन्नड व सोयगाव तालुका मका उत्पादनात आघाडीवर आहे; मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ८५.४८ टक्के क्षेत्रावरच मक्याची पेरणी झाली होती. त्यातही ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले होते. यंदा केंद्र सरकारने मक्याच्या हमीभावात २७५ रुपयांची वाढ करून यंदा १७०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला; मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरुवातीला जाधववाडी अडत बाजारात ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलने मका खरेदी करण्यात येत होता. यात १९ ते २० टक्के ओलसरपणा असल्याचे सांगितले जात होते.
महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनमार्फत ५ ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात मका खरेदी सुरू करण्यात आली. ३१ डिसेंबर २०१८ ही मका खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची अंतिम तारीख होती; मात्र नंतर सरकारने १५ जानेवारीपर्यंत मुदत वाढविली. ३१ डिसेंबरपर्यंत औरंगाबाद तालुक्यात करमाड येथे १८१ शेतकऱ्यांनी ३८०४ क्विंटल, गंगापूर येथे ११७ शेतकऱ्यांना ११०९ क्विंटल, कन्नड येथे ९७ शेतकऱ्यांनी २३४१ क्विंटल, वैजापूर येथे १७ शेतकऱ्यांनी २६७ क्विंटल, तर लासूर स्टेशन येथे २२ शेतकऱ्यांनी २०५ क्विंटल, असे एकूण ४३४ शेतकऱ्यांनी ७७२६.५० क्विंटल मका शासनाला विकला. आजमितीपर्यंत त्यातील २४६ शेतकऱ्यांना ७२ लाख ३४ हजार ३५० रुपये एवढी रक्कम शासनाने दिली आहे. विशेष म्हणजे मका विक्रीसाठी १२२३ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. उर्वरित ७८९ पैकी काही शेतकऱ्यांनी भाव आणखी वाढतील म्हणून मका घरी ठेवला आहे, तर त्यातील अनेक शेतकऱ्यांनी अडत बाजारात मका हमीभावापेक्षा कमी दरात विक्री केला आहे. कारण, शासनाच्या खरेदी केंद्रावर त्वरित रक्कम मिळत नाही. यामुळे शेतकरी कमी भावात अडतवर मका विक्री करताना दिसत आहेत.
अडत बाजारात १४७५ ते १७०० रुपये भाव जाधववाडी येथील कृउबाच्या अडत धान्य बाजारात शेतकऱ्यांकडील मक्याला १४७५ ते १७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. चांगल्या वाळलेल्या मक्यालाच १७०० रुपये भाव दिला जात आहे. यंदा ६० टक्क्यांनी मक्याची आवक घटली आहे. मक्याची आवक अंतिम टप्प्यात असून, सध्या दररोज २५ ते ३० क्विंटल आवक होत आहे. दुष्काळामुळे मका उत्पादन घटले आहे; मात्र देशात मका आयात होत आहे. यामुळे मक्यात भाववाढ होईल की नाही, हे सांगणे सध्या कठीण असल्याचे मत अडत व्यापारी हरीश पवार यांनी व्यक्त केले.