औरंगाबाद : शहरातील हॉल, सभागृहांमध्ये होणारे सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विवाह समारंभांना केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या नियमांचे पालन न करणार्या संबंधित संस्था, समित्या व मालकांवर कडक कारवाई करावी, असे आदेश महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी जारी केले. खुली मैदाने, खुल्या जागांवरील समारंभास क्षेत्रफळानुसार ५० व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी देण्यात येईल. यासाठी संबंधित भागातील पोलीस ठाणे व पालिकेच्या प्रभाग कार्यालयाची संबंधितांना परवागनी घेणे अनिवार्य राहील.
नियमांचे पालन हवे
शहरातील उद्याने, खुल्या जागा, रेल्वे वाहतूक, शाळा, महाविद्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नेट कॅफे, योगा सेंटर, क्रीडा संकुले येथे कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य राहील. नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.