छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सुट्या आणि त्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीने रक्तदात्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे शहरातील काही रक्तपेढ्यांमध्ये एक दिवस, तर काही रक्तपेढ्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. एकट्या घाटीतील विभागीय रक्तकेंद्रात अवघ्या ७५ रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. त्यामुळे मतदानाआधी रक्तदान करा, असे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे.
शहरात १० रक्तपेढ्या असून, दिवाळी सुट्यांमध्ये दरवर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. सुट्यांमुळे नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी गावी जातात. यावर्षी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही निवडणुकीत गुंतले आहेत. परिणामी, दात्यांची संख्या घटली आहे. त्याचा परिणाम रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्यावर झाला आहे. घाटी रुग्णालयात दररोज १२०० ते १५०० रुग्ण दाखल असतात. अशा परिस्थितीत येथील रक्तपेढीत केवळ ७५ रक्त पिशव्या उपलब्ध आहेत.
जिल्हा रुग्णालयात १८ पिशव्याजिल्हा रुग्णालयातील रक्त केंद्रात सध्या १८ रक्तपिशव्या उपलब्ध आहेत. रक्तदान शिबिराची आवश्यकता असून, नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे.- डाॅ. अपर्णा जक्कल-दिकोंडवार, रक्तपेढीप्रमुख, जिल्हा रुग्णालय
रक्तदानासाठी पुढे यासध्या दररोज स्वेच्छेने रक्तपेढीत येऊन जवळपास १० जण रक्तदान करीत आहेत. सध्या तशी रुग्णसंख्या कमी असून, ३ ते ४ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. लवकरच मोठे रक्तदान शिबिर होणार आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. गरजू रुग्णांसाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन रक्तदान करावे.- डाॅ. भारत सोनवणे, प्राध्यापक, विकृतीशास्त्र विभाग, घाटी
दोन ते तीन दिवसांचा साठादिवाळी सुट्यांमुळे सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. लायन्स रक्तपेढीत ६० रक्तपिशव्या आहे. या दोन ते तीन दिवस पुरतील. दररोज २५ ते ३० पिशव्यांची मागणी असते. तरी जागरूक नागरिकांनी रक्तदान शिबिरे घेऊन गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे.- शामराव सोनवणे, लायन्स ब्लड सेंटर
एक दिवस पुरेल इतका साठासध्या एक दिवस पुरेल इतका साठा आहे. रक्तदात्यांना बोलावून रक्ताची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण नियमित रक्तदान शिबिरे सुरु झाल्याशिवाय ही टंचाई दूर होणार नाही. सध्या ६० रक्त पिशव्या आहेत.- आप्पासाहेब सोमासे, दत्ताजी भाले रक्तपेढी